नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. तर अनेक ठिकाणी मास्क न लावल्यास दंड आकारण्यात येत आहे. मास्क न लावल्याने कारवाई करणं तब्बल 35 गावांना महागात पडलं आहे. कारण यामुळे 35 गावांचा वीजपुरवठा झाला ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या जिल्हा बदायूं जिल्ह्यातील कुंवरगावमध्ये ही घटना घडली आहे.
एका महिला पोलीस अधिकाऱ्याने तपासणीदरम्यान मास्क न घातल्याबद्दल वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्याला दंड ठोठावला. मात्र कर्मचाऱ्याने वाद घातल्याने निरीक्षकाने त्याच्या कानशिलात लगावली आणि नंतर पोलिस ठाण्यात नेलं. यामुळे वीज वितरण विभागाचे कर्मचारी संतप्त झाले आणि वीज विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले. तसेच या कर्मचाऱ्यांनी निषेध म्हणून तब्बल 35 गावांचा वीजपुरवठा बंद केला.
"महिला अधिकाऱ्याने मोबाईल हिसकावून घेतला आणि कानशिलात लगावली"
सुनील कुमार असं वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. सुनील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटदुखीचं औषध घेण्यासाठी निघालो होतो आणि त्याचवेळी चौकाजवळ तपासणी सुरू होती. कुंवरगाव पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस अधिकारी शर्मिला शर्मा यांनी थांबवलं. मास्क न घातल्याने दंड बजावला. वीज कर्मचारी असल्याने वीज अभियंत्यांशी बोलण्यासाठी मोबाईल बाहेर काढला असता महिला अधिकाऱ्याने मोबाईल हिसकावून घेतला आणि कानशिलात लगावली असा आरोप सुनील कुमार यांनी केला आहे.
"सुनील कुमार यांना सोडण्यास नकार दिल्याने वीज विभागाचे कर्मचारी आक्रमक"
सुनील यांनी आपल्याला मारहाण करत पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि कोठडीत बंद केल्याचं देखील म्हटलं आहे. घटनेची माहिती मिळताच वीज विभागाचे कर्मचारी सुनील कुमार यांना सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र पोलिसांनी सुनील कुमार यांना सोडण्यास नकार दिल्याने वीज विभागाचे कर्मचारी आक्रमक झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात आंदोलन करण्यास सुरवात केली. तसेच वीज उपकेंद्रात धरणं आंदोलन सुरू केलं. यानंतर कर्मचार्यांनी शहरासह अनेक गावांचा वीजपुरवठाही बंद केला. सीओ सिटी घटनास्थळी पोहोचले आणि कर्मचार्यांना कारवाईचे आश्वासन देऊन वीजपुरवठा सुरू केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.