कोलकाता - भावंडांमध्ये प्रेम आणि आपलेपणाची वीण भक्कम असली की ती एकमेकांसाठी काहीही करण्यास तयार होतात. अशाच एका भावाने वाघाच्या जबड्यात सापडलेल्या आपल्या भावाला वाचवण्यासाठी चक्क त्या वाघाशीच पंगा घेतला. या भावाने वाघाच्या पश्चिम बंगालमधील सुंदरबन परिसरातील एका गावात ही घटना घडली आहे. सुंदरबनमधील गोसाबा येथील एका गावात दिवाकर आणि देवव्रत सरकार हे भाऊ राहतात. सुंदरबनातील दाट जंगलांमध्ये खेकडे पकडून आपली उपजिविका करतात. रविवारी हे दोघे भाऊ अन्य एक मच्छिमार सहकारी गौर मौडलसोबत खोलखली नदीजवळ खेकडे पकडण्यासाठी गेले होते. दिवाकर हा बाहेर थांबला. तर देवव्रत आणि गौर खेकडे पकडू लागले.त्याचदरम्यान तेथे शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी त्यांनी नदीत उडी घेतली. मग वाघानेही त्यांच्यापाठोपाठ नदीत उडी घेतली. यादरम्यान, गौर याने स्वत:ला वाचवले, पण देवव्रत वाघाच्या तावडीत सापडला. वाघाने त्याचा गळा आणि हात पकडला. आपला भाऊ वाघाच्या जबड्यात सापडला हे पाहून दिवाकरने स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता नदीत उडी घेतली. त्याने एक छडी आणि होडीमधील लाकडाचा वल्हा घेऊन वाघाला मारण्यास सुरुवात केली. दिवाकरने केलेल्या प्रहारांमुळे जखमी झालेल्या वाघाने देवव्रतला सोडून जंगलात पलायन केले. त्यानंतर दिवाकरने आपल्या भावाला रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचारानंतर देवव्रतच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
भावासाठी कायपण! भावाचा जीव वाचवण्यासाठी त्याने घेतला वाघाशी पंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 5:21 PM