बंगळुरू - शत्रूराष्ट्राच्या ड्रोेनचा शोध घेणारे पहिले स्वदेशी बनावटीचे उपकरण विकसित करण्यात भारताला यश आले आहे. त्यामुळे भविष्यात शत्रूराष्ट्राकडून ड्रोेन हल्ला झाल्यास तो परतवून लावणे शक्य होणार आहे. मात्र सध्यातरी हे उपकरण प्रायोगिक टप्प्यात आहे.दिल्लीमध्ये ड्रोेन हल्ला होऊ शकतो असा इशारा इंटेलिजन्स ब्युरोने 2015 साली दिला होता. त्यानंतर हवाई दलाच्या दक्षिण कमांडने ड्रोेन आणि आकाशात उड्डाण करू शकणाऱ्या अन्य उपकरणांच्या सहाय्याने हल्ला होण्याचा धोका असल्याची शक्यता वर्तवली होती. अशा परिस्थितीत ड्रोेन हल्ल्यांची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात अधिक माहिती देताना भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (बीईएल) चे माजी संचालक असलेले ए. टी. कलघात्की यांनी सांगितले की, "बीईएलने या उपकरणाचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी संबंधित यूजर एजन्सींसोबत चर्चा केली आहे. या उपकरणाचे पहिले प्रात्यक्षिक दोन महिन्यांच्या आत दाखवण्यात येऊ शकते." ही प्रणाली सीमारेषेवर आणि पर्वतीय क्षेत्रात तैनात असलेल्या सशस्त्र दलांना सर्वप्रथम वापरण्यासाठी देण्यात येणार आहे. तसेच विमानतळ, संसद अशा संवेदनशील ठिकाणीही हे उपकरण तैनात करण्यात येऊ शकते. ड्रोेनचा शोध घेण्यासाठी हे उपकरण पोर्टेबल प्रोटोटाइप रडार आणि इलेक्ट्रॉ-ऑप्टिकल आणि इलेक्ट्रॉमॅग्नेटिक सेंसर्सचा वापर करते. सद्यस्थितीत हे उपकरण नमुनादाखल तयार केलेले आहे. त्यामुळे आम्ही मर्यादित रेंज असलेले हे उपकरण विकसित केले आहे. ते उपकरण 3.5 किमीच्या सीमेमध्ये काम करते.पण आम्ही याच्या रडारमध्ये बदल करू शकतो. तसेच उपयोगकर्त्यांच्या गरजेनुसार त्याची सीमा वाढवू शकतो, असे कलघात्की यांनी सांगितले. हे उपकरण ड्रोनला सहजपणे शोधून काढते. मात्र ड्रोेनला निष्क्रिय करणे किंवा नष्ट करणे आव्हानात्मक आहे. "सद्यस्थितीत आमच्याकडे एक सॉफ्ट-किल प्रोटोटाइप तयार आहे आणि हार्ड किल प्रोटोटाइप तयार करण्यासाठी बीईएल डीआरडीओसोबत मिळून काम करत आहे," असे कलघात्की यांनी सांगितले.
भारताचे हे अस्त्र ठरणार शत्रूच्या ड्रोेन काळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2018 6:27 PM