नवी दिल्ली - भारताच्या जी-२० अध्यक्षपदाखाली अनेक ठोस निर्णयांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय शिखर परिषदेत जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्णायक नेतृत्व आणि ‘ग्लोबल साउथ’चा आवाज बुलंद केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जागतिक नेत्यांनी भारताच्या आदरातिथ्याचे कौतुक केले आणि यशस्वी शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक केले, तसेच ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हा देशाचा संदेश सर्व प्रतिनिधींसह जोरदारपणे प्रतिध्वनित झाला.
“भारताच्या नेतृत्वाखाली, आम्ही हे दाखवून दिले आहे की आम्ही महत्त्वाच्या वेळी एकत्र येऊ शकतो, जेव्हा तुम्ही ‘भारत मंडपम’ मध्ये फिरता आणि डिस्प्ले पाहाल, तेव्हा पंतप्रधान मोदींनी राष्ट्राच्या दुर्गम भागातील लोकांपर्यंत डिजिटल आणि तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी आपण काय करू शकतो हे दाखवून दिले, असे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक एका बैठकीत म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी परिषदेचे उत्कृष्ट नेतृत्व केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक केले, तर रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी भारताच्या जी-२० अध्यक्षपदाखाली सहकार्य मजबूत करण्याचे आवाहन केले.
तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी पंतप्रधान मोदींच्या आदरातिथ्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि आशा व्यक्त केली की शिखर परिषद जगासाठी वरदान ठरेल.
अनेक नेत्यांनी ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज बुलंद केल्याबद्दल पंतप्रधानांचे कौतुक केले आणि आफ्रिकी संघाला जी-२० चे सदस्य बनविण्याच्या मुख्य निर्णयाचे एकमताने स्वागत केले.
‘मोदी एकत्र आणत आहेत : बायडेन’मोदींचे स्वागत करताना, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, “आफ्रिकी संघ महत्त्वपूर्ण भागीदार आहे. मोदी आम्हाला एकत्र आणत आहेत, आम्हाला एकत्र ठेवत आहेत, आम्हाला आठवण करून देत आहेत की आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्याची आमच्यात क्षमता आहे.
अमेरिकी माध्यमांकडून भारताचे कौतुकnजी-२० परिषदेशी संबंधित बातम्या जगभरातील माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. अमेरिकी माध्यमांनीही त्या ठळकपणे प्रसिद्ध केल्या आहेत. तेथील लेखांमध्ये भारतीय मुत्सद्देगिरीचे अप्रत्यक्षपणे कौतुक केले. nन्यूयॉर्क टाईम्समधील एका लेखात म्हटले आहे की, परिषदेच्या संयुक्त घोषणेमध्ये रशियाच्या आक्रमक भूमिकेचा आणि युक्रेन युद्धाबाबतच्या क्रूर वर्तनाचा निषेध करण्यात आला नाही. nकर्जाच्या मुद्द्यावर गरीब देशांच्या समस्यांवर मात करण्यासाठी जागतिक बँकेसारख्या संस्थांमध्ये सुधारणा करण्यावर सहमती झाली, जी-२० मध्ये आफ्रिकी संघाचा समावेश करण्यात आला आणि हवामान बदलास सामोरे जाण्यासाठी असुरक्षित देशांना अधिक वित्तपुरवठा करण्यावर भर देण्यात आला, असेही या लेखात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी केले नेतृत्वअमेरिकी प्रसारमाध्यमांमधील लेखानुसार, जी-२० परिषदेदरम्यान जो बायडेन बहुतेकवेळा फारसे सक्रिय दिसले नाहीत आणि त्यांनी पंतप्रधान मोदींना नेतृत्व करण्याची परवानगी दिली. यापूर्वी अशा कार्यक्रमांमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठका घेत असत; परंतु यावेळी त्यांची कमतरता स्पष्टपणे दिसून आली. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी भारताची क्षमता जगासमोर आणली. त्यांनी जी-२० देशांसमोर भारताला जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि तरुण कार्यबल असलेला देश म्हणून सादर केले.