'या' देशाचे पासपोर्ट सर्वात शक्तिशाली; जाणून घ्या भारताचा कितवा नंबर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 08:55 PM2023-07-18T20:55:57+5:302023-07-18T20:56:46+5:30
2023 मधील शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी समोर आली आहे. पहिल्या क्रमांकावर मोठा फेरबदल झाला आहे.
World Most Powerful Passport 2023:पासपोर्ट कोणत्याही देशातील सर्वोच्च डॉक्युमेंट असते. पासपोर्टमुळेच एखाद्या व्यक्तीला एका देशातून दुसऱ्या देशात प्रवेश मिळतो. 2023 मध्ये कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे, याची यादी समोर आली आहे. दरम्यान, शक्तिशाली पासपोर्टचे फायदे काय असतात? भारताचाचा कितवा नंबर आहे? हेनले पासपोर्ट इंडेक्सच्या रिपोर्टमधून मोठी माहिती समोर आली आहे.
लंडनची इमिग्रेशन कन्सल्टन्सी हेन्ली अँड पार्टनर्स दरवर्षी जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर करते. 2023 ची जागतिक क्रमवारी नुकतीच जाहीर झाली आहे. या यादीत जापानने पाच वर्षांनंतर पहिले स्थान गमावले आहे.
सिंगापूरने जपानला मागे टाकले
हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार या वर्षी सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून समोर आला आहे. सिंगापूरच्या पासपोर्टवर जगातील 192 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येऊ शकतो. या यादीत जापानची आता तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. जापानी पासपोर्टवर व्हिसाशिवाय 189 देशांमध्ये प्रवास करता येईल.
या यादीत जर्मनी, इटली आणि स्पेन हे युरोपातील 3 देश दुसऱ्या स्थानावर आहेत. या तिन्ही देशांचे पासपोर्ट असलेले लोक जगातील 190 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. जापानबरोबरच ऑस्ट्रिया, फिनलंड, फ्रान्स, लक्झेंबर्ग, दक्षिण कोरिया आणि स्वीडनचे पासपोर्टही तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
पासपोर्टच्या क्रमवारीनुसार, चौथा शक्तिशाली पासपोर्ट डेन्मार्क, आयर्लंड, नेदरलँड आणि युनायटेड किंगडमचा आहे. हे लोक 188 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. दुसरीकडे, बेल्जियम, झेक प्रजासत्ताक, माल्टा, न्यूझीलंड, नॉर्वे, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंडचे पासपोर्ट असलेले लोक 187 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. हा क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.
भारताचा 80 वा क्रमांक
या क्रमवारीत भारताचे स्थान 80 वे आहे. भारतीय पासपोर्ट असलेले लोक जगातील 57 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. भारतासोहत सेनेगल आणि टोगोसारखे देस याच स्थानावर आहेत. या यादीत भारताचा शेजारी देश चीनचे रँकिंग 63 आहे, तर पाकिस्तानचे रँकिंग 100 आहे. चीनचे लोक 80 देशांमध्ये आणि पाकिस्तानचे लोक 33 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.