लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यास भारत सज्ज झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. कोरोनावरील लसी विकसित करणाऱ्या शास्रज्ञांचे मोदी यांनी अभिनंदन केले.
कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांनी परवानगी दिल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मोदींनी हे वक्तव्य केले. मेट्रॉलॉजी परिषदेमध्ये मोेदी म्हणाले की, विकसित झालेल्या कोरोना लसी भारतात बनल्या असून, त्याचा देशाला सार्थ अभिमान आहे. शास्रज्ञ व तंत्रज्ञांनी दिलेल्या योगदानामुळेच ही गोष्ट शक्य झाली.
कोविशिल्ड लसीच्या संशोधन व उत्पादनात सीरम इन्स्टिट्यूटचा मोठा वाटा आहे, तर भारत बायोटेकने बनविलेली कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस आहे. मोदी यांनी नॅशनल अॅटोमिक टाइमस्केल व भारतीय निर्देशांक द्रव्य प्रणाली देशाला समर्पित केली. नॅशनल एन्व्हॉयर्नमेन्टल स्टॅण्डर्ड्स लॅबोरेटरीचे भूमिपूजनही मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाले.
आम्हाला प्रत्येकाचे मन जिंकायचे आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दर्जेदार भारतीय वस्तूंच्या माध्यमातून जगातील प्रत्येकाचे मन आम्हाला जिंकायचे आहे. देशातील सार्वजनिक व खासगी क्षेत्रात तयार झालेली वस्तू उत्तम दर्जाचीच असायला हवी.
विज्ञान हा माझा प्राणवायू आहे. मला विज्ञानापासून ऊर्जा मिळत असते. आमच्या कंपनीला जगभरातील १२३ देशांना लसीचा पुरवठा करण्याचा अनुभव आहे. झिका विषाणूवरील लसीसाठी पेटंट दाखल करण्यात आम्ही आघाडीवर होतो. - डॉ. कृष्णा इल्ला, अध्यक्ष, भारत बायोटेक
मुलांवर कोव्हॅक्सिनच्या चाचण्या १२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांवर कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्या करण्यास भारत बायोटेक या कंपनीला औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे.
सौदीच्या सीमा खुल्यानव्या कोरोना विषाणूमुळे संसर्ग अधिक फैलावू नये, म्हणून सौदी अरेबियाने दोन आठवड्यांसाठी बंद केलेल्या आपल्या सीमा रविवारपासून खुल्या केल्या व आंतरराष्ट्रीय विमानांना केलेली प्रवेशबंदीही उठविली.