नवी दिल्ली - अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. भारतामध्ये ही कंपनी हळूहळू आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. शाओमीने स्मार्टफोननंतर टीव्ही क्षेत्रातही पदार्पण केले आहे. त्यानंतर आता ही कंपनी वित्तीय सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.
लवकरच शाओमीकडून बिगर बँकींग आर्थिक कंपनी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कंपनी रिझर्व्ह बँकेची परवानगी मागणार आहे. शाओमी फायनान्शिअल सर्व्हिसेसची योजना ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती उपकरणे, जीवनशैली उत्पादने, वाहने, फर्निचर,भांडी आणि कार्यालयीन उपकरणे खरेदी करण्यासाठी कर्ज देणार आहे. याशिवाय अनेक कंपन्यांना वस्तूंच्या खरेदीसाठी क्रेडिट देणार आहे. शाओमीने भारतात कर्जाची सुविधा देणारं उत्पादन याआधीही सुरू केले आहे. यावर्षी मे महिन्यामध्ये कंपनीने लँडिंग प्लॅटफॉर्म क्रेझीबीसह भागीदारी करत भारतातील पहिले कर्जाची सुविधा देणारे उत्पादन सुरू केले.
स्वस्त स्मार्टफोनची ऑनलाईन विक्री करत शाओमीने भारतात आपला व्यवसाय सुरू केला. काही वर्षांमध्ये भारतीय स्मार्टफोनच्या बाजारात लोकप्रिय असलेल्या सॅमसंगलाही मागे टाकले. आता शाओमी टीव्ही क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनीने भारतात Mi LED टीव्हीच्या निर्मितीची घोषणा केली आहे. शाओमीने आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे एक डिक्सन टेक्नॉलॉजीसोबत भागीदारी केली आहे. ही कंपनी 32 एकर क्षेत्रात पसरली असून 850 पेक्षा जास्त कर्मचारी तेथे काम करतात. भविष्यात शाओमीच्या महत्वाकांक्षी विस्तार योजनेअंतर्गत अनेक उत्पादने बाजारात येण्याची शक्यता आहे.