भुवनेश्वर/कोलकाता : ‘यास’ चक्रीवादळ बुधवारी सकाळी ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील धमरा बंदरानजीक धडकण्याची शक्यता आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत ‘यास’ भीषण चक्रीवादळाचे स्वरुप घेत धमरा आणि चांदबाली दरम्यान धडकेल, असा अंदाज आहे, असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा आणि भुवनेश्वर येथील विभागीय हवामान केंद्राचे हवामान शास्रज्ञ डाॅ. उमाशंकर दास यांनी सांगितले. प. बंगालमधून ८ लाख तर, ओडिशातून ३ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत असून मंगळवारी दुपारपर्यंत ६० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले अहे. ‘यास’ किनारपट्टीवर धडकण्याआधीच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले.राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने ओडिशात ४५ आणि पश्चिम बंगालमध्ये ४५ पथके तैनात केली आहेत. पारादीप बंदरावरील कामकाज मंगळवार दुपारपासून बंद करण्यात आले असून बंदर परिसरातील मालवाहक वाहने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली आहेत. तसेच ओडिशातील क्षेपणास्र केंद्राच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेत उपाय योजण्यात आले आहेत. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून दक्षिण-पूर्व रेल्वेने बुधवारपर्यंत अनेक प्रवासी विशेष रेल्वे रद्द करण्याची घोषणा केली आहे. ओडिशाचे विशेष मदत आयुक्त प्रदीप जेना यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांना बालासोर, भद्रक, केंद्रपाडा आणि जगतसिंहपूण या चार किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांतून लोकांना मंगळवार दुपारपर्यंत सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जवळपास ७५०००० लोकांंसाठी ७ हजार निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कसा आहे प्रवास?भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगाल उपसागराच्या पूर्व-मध्य क्षेत्रात ‘यास’ चक्रीवादळ तयार होत ते उत्तर आणि वायव्येकडून पारादीपच्या दक्षिण आणि आग्नेयकडे आणि बालासोरच्या दक्षिण-आग्नेयकडे कूच करील. २६ मे रोजी चक्रीवादळ अधिक तीव्र होत ताशी १५५-१६५ किलोमीटर वेगाने भद्रक जिल्ह्यातील चांदबालीनजीक धडकण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आणि नंतर सहा तास चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसेल.