Yasin malik: यासीन मलिकच्या शिक्षेदरम्यान श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दगडफेक, इंटरनेट सेवा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 07:33 PM2022-05-25T19:33:52+5:302022-05-25T19:34:17+5:30
Yasin malik: जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला दिल्लीतील एनआयए कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Yasin Malik: दिल्लीतील एनआयए कोर्टात फुटीरतावादी नेता यासिन मलिकला शिक्षा सुनावण्यापूर्वी काश्मीर खोऱ्यातील वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. श्रीनगरमधील मैसुमा भागात यासीन मलिक समर्थक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यासीनच्या समर्थकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. खबरदारी म्हणून सुरक्षा दलांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
#WATCH | Terror funding case: Yasin Malik being taken out of NIA Court in Delhi. He will be taken to Tihar Jail shortly.
— ANI (@ANI) May 25, 2022
He has been awarded life imprisonment in the matter. pic.twitter.com/bCq5oo47Is
मलिकच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त
या सर्व घटनांदरम्यान प्रशासनाने श्रीनगरमध्ये तत्काळ प्रभावाने इंटरनेट सेवा बंद केली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर शहरही बंद करण्यात आले आहे. निकालापूर्वी श्रीनगरजवळील मैसुमा येथील यासीनच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. सध्या परिसरात ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. यासीन मलिकच्या घराबाहेर ही दगडफेक आणि निदर्शने करण्यात आली.
सुरक्षा दलावर अचानक दगडफेक
19 मे रोजी पटियाला हाऊस न्यायालयाचे विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी मलिकला दोषी ठरवले होते. तर, त्याच्या शिक्षेबाबत आज निकाल राखून ठेवला होता. आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर प्रशासन आधीच सतर्क होते. मात्र बुधवारी यासीनच्या समर्थकांची थेट सुरक्षा दलांवर अचानक दगडफेक केल्याने मोठा गोंधळ उडाला. निकालादरम्यान, यासिन मलिकला न्यायालयात नेण्यात येत असतानाही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
यासिनला जन्मठेप
यासीन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. यासीन हा जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख आहे. यासीनवर भडकाऊ भाषण केल्याचाही आरोप आहे. यासीनला शिक्षा सुनावण्यापूर्वीच जम्मू-काश्मीरमधील प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवली.
यासीनने सर्व आरोप मान्य केले होते
जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासीन मलिक यांने त्याच्यावर लावलेल्या आरोपांना विरोध केला नाही. आरोपांमध्ये UAPA ची कलम 16 (दहशतवादी कृत्ये), 17 (दहशतवादी कृत्यांसाठी निधी गोळा करणे), 18 (दहशतवादी कट रचणे) आणि 20 (दहशतवादी टोळी किंवा संघटनेचा सदस्य असणे), भारतीय दंड 120-बी(गुन्हेगारी कट) आणि 124-A (देशद्रोह) ही कलमे लावली आहेत.