नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे जगभरातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला आहे. भारतीयअर्थव्यवस्थाही मंदीकडे वाटचाल करीत आहे. चालू आर्थिक वर्ष हे आर्थिक विकासात सर्वात वाईट वर्ष ठरण्याची भीती क्रिसील या पतमापन संस्थेने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर शून्याखाली पाच एवढा कमी होण्याची भीतीही व्यक्त केली गेली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या चालू वर्षातील वाटचालीबद्दलचा अहवाल क्रिसीलने प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये वरील भाकीत करण्यात आले आहे. या वर्षामध्ये पाऊस हा नेहमीप्रमाणे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून त्याच्या आधारे शेतीचे उत्पादन चांगले येण्याची अपेक्षा या अहवालात गृहित धरण्यात आली आहे. शेती उत्पादनातील समाधानकारक प्रगतीने आर्थिक विकासाचा दर काहीसा वाढल्याचे क्रिसीलने स्पष्ट केले आहे.
एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत विकास दर २५ टक्क्यांपर्यंत आक्रसण्याची भीती या अहवालात आहे. या तिमाहीतच अर्थव्यवस्थेचे सर्वाधिक नुकसान संभवते. पुढील तिमाहीत सेवा क्षेत्र, शिक्षण आणि पर्यटन या क्षेत्रांना फटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.
तीन वर्षे राहू शकेल मंदीचा प्रभाव
च्कोरोनाचा अर्थव्यवस्थेला बसणारा फटका खूप मोठा असणार आहे. यामुळे एकूण देशांतर्गत उत्पादनातील सुमारे १० टक्के रक्कम ही कायमस्वरूपी कमी होणार असल्याची शक्यता या अहवालात क्रिसीलने व्यक्त केली आहे. मंदीच्या या प्रभावातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागण्याची भीतीही वर्तविण्यात आली.
च्भारताच्या ६९ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत केवळ तीनवेळा मंदीचा सामना अर्थव्यवस्थेला करावा लागला आहे. आर्थिक वर्ष १९५८, १९६६ आणि १९८० यामध्ये मंदी असल्याचे आकडेवारीवरून दिसते. यावेळी पावसाने डोळे वटारल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. यंदा मात्र परिस्थिती उलट आहे. यावेळी शेतीचे उत्पन्न चांगले येण्याची अपेक्षा असून, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बसणारा एकूण फटका काही प्रमाणात कमी होण्याची शक्यताही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.