KarnatakaCMRace: येडियुरप्पांची खुर्ची राहणार की जाणार? सुप्रीम कोर्टात काय घडू शकतं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 09:12 AM2018-05-18T09:12:04+5:302018-05-18T09:53:15+5:30
सुप्रीम कोर्टात आज येडियुरप्पा समर्थन पत्र सादर करणार आहेत.
नवी दिल्ली- भाजपा नेते येडियुरप्पा यांनी गुरूवारी (ता. 17 मे) कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली पण येडियुरप्पा यांचं पद राहणार की जाणार? हे अजूनही निश्चित नाही. सुप्रीम कोर्टात आज येडियुरप्पा समर्थन पत्र सादर करणार आहेत. सरकार स्थापनेचा दावा करताना जे पत्र येडियुरप्पा यांनी राज्यपालांना दिलं होतं तेच पत्र सुप्रीम कोर्टात आज येडियुरप्पा यांना सादर करायचं आहे. सुप्रीम कोर्टात न्यायमुर्ती ए.के सिकरी यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यिय खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी करत आहे.
सुप्रीम कोर्टात आज काय घडू शकतं?
1. कायदे तज्ज्ञ आणि सुप्रीम कोर्टाचे वकील एमएल लाहौटी यांच्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाच्या नऊ न्यायाधिशांच्या खंडपीठाने एसआर बोम्मई प्रकरणात व्यवस्था दिली आहे. यामध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्ट करावी, असा मार्ग सांगण्यात आला आहे. भाजपाने जो दावा केला आहे त्याच्या परिक्षणानंतर सुप्रीम कोर्ट राज्यपालांच्या निर्णयावर सहमती दर्शवतिल आणि विधानसभेत फ्लोअर टेस्टनंतर भाजपा बहुमत सिद्ध करेल.
2. सुप्रीम कोर्ट राज्यपालांना त्यांच्या निर्णयावर पुन्हा एकदा पुर्नविचार करायला सांगू शकतं.
3. राज्यपालांनी येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची वेळ दिली आहे. 15 दिवसांची ही वेळ कमी करून 5 किंवा 7 दिवस होऊ शकते.
4. राज्यपालांचा निर्णय रोखण्याचा निर्णय सुप्रीम कोर्ट देऊ शकत नाही. पण आदेशाच्या आधारावर ज्युडिशिअल रिव्ह्यू होऊ शकतं. पत्र पाहिल्यावर सुप्रीम कोर्ट पुढील निर्णय देईल, असं सांगितलं जातं आहे.