नवी दिल्ली - देशात लसीकरण मोहीम गतीमान करण्यात आली असून सोमवारी एकाच दिवसांत रेकॉर्डब्रेक लसीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे, मोदींचे बॅनर झळकावून अभिनंदन करण्यात येत आहे. त्याबद्दल काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींनी सरकारचे अभिनंदन केले असून सल्लाही दिला आहे. तर, रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदी सरकारच्या जाहीरातबाजीवर टीका केली आहे.
देशात 21 जून रोजी झालेल्या रेकॉर्डब्रेक लसीकरणाचे राहुल गांधी यांनी कौतुक केले. तसेच, केवळ एका दिवसांत 80 लाख डोस देऊन काहीही होणार नाही, तर दररोज 80 लाख नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे असल्याचेही राहुल गांधींनी म्हटले आहे. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ता रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर टीका केली. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कोरोनावर श्वेतपत्रिका काढली असून पत्रकार परिषदेमध्ये याबाबत विस्तृत माहिती दिली. मोदी सरकारसाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील उपाययोजनांसाठीचा अहवाल या श्वेत पत्रिकेमध्ये तयार करण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेसाठी सरकारने अगोदरपासूनच तयारीनीशी सज्ज राहायला हवं, असेही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
मनमोहनसिंग सरकारच्या काळात फेब्रवारी 2012 मध्ये देशात एकाच दिवसांत सर्वाधिक रेकॉर्डब्रेक पोलिओ डोस देण्यात आले होते. मात्र, तेव्हा कुठेही त्याचे बॅनर झळकविण्यात आले नाहीत. सध्याच्या पंतप्रधानांमध्ये आणि तेव्हांच्या पंतप्रधानांनमध्ये हाच फरक असल्याची टीका सुरजेवाला यांनी केली.
मोदींचं ट्विट, वेल डन इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन आठवड्यापूर्वी देशभरात २१ जूनपासून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. त्यानुसार, देशात २१ जून रोजी देशात तब्बल ६९ लाख लोकांचे रेकॉर्डब्रेक लसीकरण करण्यात आले आहे. त्याबद्दल मोदींनी ट्विरवरुन देशवासीयांचे अभिनंदन करत वेल डन इंडिया.. असेही म्हटले आहे. केंद्र सरकारच्या या गतीमान लसीकरण मोहिमेचे आभार मानण्याच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केल्या आहेत. तसेच, अनेक ठिकाणी मोदींचे बॅनर झळकले आहेत.
कॅम्पसमध्ये फलक लावण्याच्या सूचना
विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्वच विद्यालये, तंत्रशिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारे फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. देशभरात १८ आणि त्यापेक्षा वरील वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण सुरु केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार कॅम्पसमध्ये फलक लावून मानावेत, अशी सूचना आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी व्हॉट्सअप संदेशातून विद्यापीठांना केली आहे.