प्रयागराज - कुंभमेळ्यासाठी प्रयागराज तीर्थ येथे देश-विदेशातून हजारो भाविक दाखल झाले आहेत. योगगुरु रामदेव बाबा यांनी देखील कुंभमेळ्यात सहभागी होऊन संत आणि साधूंना धूम्रपान सोडण्याचं आवाहन केलं आहे. 'आपण राम आणि कृष्णाचे भक्त आहोत ज्यांनी त्यांच्या जीवनात कधीही धूम्रपान केलं नाही, मग तुम्ही का करता? आपण धूम्रपान सोडणार अशी शपथ घेतली पाहिजे', असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.
रामदेव बाबा यांनी कुंभमेळ्यात असणाऱ्या अनेक साधूंकडून चिलम गोळा केली आणि आपण पुन्हा कधी तंबाखूला हात लावणार नाही अशी शपथ घेण्यास सांगितले आहे. ‘मी अनेक तरुणांना तंबाखू आणि धूम्रपानाचं व्यसन सोडायला लावलं आहे. मग महात्मांना का नाही सांगू शकत’, असंही रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. कुंभमेळ्यासाठी अवघी प्रयागराज नगरी सजली असून जागोजागी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. सरकारी इमारतींवर तसेच शहरातील पुलांवर व चौकांवर कुंभमेळ्याशी निगडित धार्मिक चित्रे चितारण्यात आली आहेत.
निदान पुढच्या वर्षीतरी 'संन्याशाला भारतरत्न' द्या, रामदेव बाबांची मागणी
रामदेव बाबा यांनी भारतरत्न पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर काहीशी नाराजी व्यक्त केली होती. आत्तापर्यंत, महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद किंवा शिवकुमार स्वामीजी यांना पुरस्कार मिळायला हवा होता. मात्र, गेल्या 70 वर्षात एकाही संन्याशाला भारतरत्न देण्यात आला नाही, दे दुर्भाग्य असल्याचं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं. तसेच पुढच्यावर्षी तरी एखाद्या संन्याशाला भारतरत्न द्या, अशी मागणीही बाबा रामदेव यांनी केली आहे.