कोरोना लढ्यात योग उपयुक्त; प्राणायामाने प्रतिकारशक्ती वाढते- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 03:10 AM2020-06-22T03:10:24+5:302020-06-22T03:10:39+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात योगाच्या उपयुक्ततेवर भर दिला.
नवी दिल्ली : सध्याच्या महामारीविरुद्ध लढताना योगाची आपल्याला मदत होत आहे. प्राणायामामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते व श्वसनाचे विकार दूर होतात, असे प्रतिपादन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात योगाच्या उपयुक्ततेवर भर दिला.
सन २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केल्यापासून प्रथमच याचे कार्यक्रम व्हर्च्युअल पद्धतीने झाले. हा दिवस आपल्याला विश्वबंधुत्वाची शिकवण देतो, असे सांगून मोदी म्हणाले की, योगामुळे मानसिक शांती मिळते व आचार-विचारात सकारात्मकता येते. आपण आरोग्य व अपेक्षांची तार जुळविली, तर समग्र मानवी समाज आरोग्यसंपन्न व आनंदी होण्याचा दिवस फार दूर नाही. योगामुळे हे नक्कीच घडू शकते.
सध्याच्या संकटात जगाला योगाची निकड अधिक गांभीर्याने होत असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, रोगप्रतिकारशक्ती बळकट असेल, तर आपण रोगांवर मात करू शकतो. योगासनांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्याखेरीज शरीर बळकट होऊन चयापचय क्रियाही सुधारते. ‘कोविड-१९’ चा आजार मुख्यत: श्वसनयंत्रणेवर आघात करीत असल्याने अशा वेळी आपल्याला प्राणायामाचा खूप उपयोग होऊ शकतो.
पंतप्रधान म्हणाले की, योगामुळे ऐक्यभावना वाढीस लागते व मानवतेचे बंध मजबूत होतात. योग वंश, वर्ण, लिंग, धर्म अथवा देश यात कोणताही भेदभाव करीत नाही. कोणीही योग आत्मसात करू शकतो. त्यासाठी लागतो फक्त थोडा वेळ व थोडी मोकळी जागा.
संकटाच्या काळातही मन स्थिर ठेवून संकटास धैर्याने सामोरे जाण्याचे मनोबल योगामुळे आपल्याला प्राप्त होते. मन निग्रही पण संयमी बनते.