जगभरात योग उत्साहात!, लाखो लोकांनी केली योगासने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 04:24 AM2018-06-22T04:24:58+5:302018-06-22T04:24:58+5:30
भारतासह जगभरात गुरुवारी योगविद्येचे महत्त्व विशद करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करून आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नवी दिल्ली : भारतासह जगभरात गुरुवारी योगविद्येचे महत्त्व विशद करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करून आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहराडूनमधील कार्यक्रमात ५० हजार लोकांसमवेत योगासने केली. ते म्हणाले की, संघर्ष व तणावाने ग्रस्त असलेल्या जगातील लोकांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य योगविद्येमध्ये आहे. संयुक्त राष्ट्रांतही योगदिन साजरा झाला.
योगासने केल्याने आरोग्य उत्तम राहाते हे सत्य पटल्याने जगभरातील अनेक देशांनी योगविद्येचा अंगीकार केला आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, विशाल जनचळवळीचे रूप धारण केलेल्या योगविद्येने जगातील करोडो लोकांचे आयुष्य समृद्ध केले आहे. काही तांत्रिक बाबींमुळे केंद्र सरकारच्या माहिती विभागाला (पीआयबी) यूट्युब चॅनलवरून पंतप्रधानांच्या डेहराडूनच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करता आले नाही. नेमका हा कार्यक्रम संपायला आणि यूट्यूबमधील तांत्रिक अडचण दूर व्हायला एकच गाठ पडली.
देशाच्या प्रत्येक राज्यात योग दिन साजरा झाला. ज्या राज्यांत भाजपाची सत्ता नाही, तिथे भाजपाचे केंद्रीय मंत्री या कार्यक्रमासाठी गेले होते. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, हरयाणा, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड आदी राज्यांत तेथील मुख्यमंत्री सहभागी झाले होते.
>नितीशकुमारांचे ‘ना’
विविध राज्यांमध्ये योग दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमांत अनेक केंद्रीय मंत्री, राज्यपाल तसेच भाजपाचे नेते सहभागी झाले होते. मात्र योगासने ही वैयक्तिक बाब असून, त्याचे प्रदर्शन मान्य नाही, असे मत असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी योगदिनापासून दूर राहणे पसंत केले.
मोदींबरोबर दुरावा निर्माण झालेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मात्र विद्यार्थ्यांसमवेत योगदिनाच्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला. केरळमध्ये अनेक नन्सनी योगासने केली.
>राजस्थानच्या कोटा येथे एक लाखाहून अधिक लोकांनी योगासने करुन विश्वविक्रम केला. याची गिनिज बुकात नोंद घेण्यात आली आहे. बाबा रामदेव यांनी यावेळी योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली. म्हैसूरमध्ये २०१७ साली योगशिबिरात ५५,५२४ जण सहभागी झाले होते. हा विक्रम गुरुवारी मोडला.
>राष्ट्रपती सहभागी : विदेश दौºयावर गेलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुरिनाममध्ये राष्ट्राध्यक्ष देसिरे डेलानो यांच्यासमवेत योगासने केली.