योगींचे मोदींच्या पावलावर पाऊल?; आदित्यनाथ यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 02:45 PM2022-04-11T14:45:24+5:302022-04-11T15:36:54+5:30

योगी आदित्यनाथ दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतील.

Yogi Adityanath likely to be appointed as a member of BJP's parliamentary board. Candidate for the post of PM after Narendra Modi | योगींचे मोदींच्या पावलावर पाऊल?; आदित्यनाथ यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली

योगींचे मोदींच्या पावलावर पाऊल?; आदित्यनाथ यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली

Next

लखनौ – उत्तर प्रदेशची सत्ता पुन्हा काबीज केल्यानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाला आणखी एक झळाळी मिळणार आहे. योगी आदित्यनाथ यांची राष्ट्रीय राजकारणाकडे वाटचाल सुरू झाली आहे. मुख्यमंत्री योगी दिल्ली दौऱ्यावर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या संसदीय बोर्डात सध्या ४ जागा रिक्त आहेत त्यामुळे योगी आदित्यनाथ यांची संसदीय बोर्डात समावेश होण्याची शक्यता आहे.

भाजपात(BJP) ज्येष्ठ नेते सुषमा स्वराज, अरूण जेटली यांच्या निधनानंतर आतापर्यंत कुणाचीही नियुक्ती झाली नाही. तर व्यैकय्या नायडू हे उपराष्ट्रपती आणि थावरचंद्र गहलोत हे राज्यपाल बनल्याने त्यांच्याही जागा रिक्त झाल्या आहेत. संसदीय बोर्डाच्या ११ सदस्यांपैकी ४ रिक्त जागांवर लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. भाजपाच्या संसदीय बोर्डात योगी आदित्यनाथ यांना जागा मिळणं खूप महत्त्वाचं मानलं जात आहे. पंतप्रधान बनण्याआधी नरेंद्र मोदी (Narendra Modi) हेदेखील गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना भाजपा संसदीय बोर्डाचं सदस्य बनवलं होतं. योगी आदित्यनाथ यांच्याआधी शिवराज सिंह चौहान यांनाही संसदीय बोर्डाचं सदस्य बनवण्यात आले आहे.

रिपोर्टनुसार, योगी आदित्यनाथ दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतील. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यूपीच्या भरघोस यशानंतर भाजपा नेतृत्वाने योगी आदित्यनाथ यांच्यावरील जबाबदारी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मोदींनंतर योगी सर्वात लोकप्रिय नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भारतीय जनता पार्टीत जर कुणी नेता सर्वात लोकप्रिय असेल तर ते योगी आदित्यनाथ आहेत. यूपीसह इतर राज्यातील निवडणूक प्रचारातही योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रचाराची धुरा असते. योगी आदित्यनाथ यांना मानणारा मोठा वर्ग इतर राज्यातही आहे. त्यामुळे भाजपात योगी आदित्यनाथ यांचे वजन सातत्याने वाढत आहे. भविष्यात योगी आदित्यनाथ हेच नरेंद्र मोदी यांचे राजकीय उत्तराधिकारी असतील असंही सांगितले जात आहे. भाजपात नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान पदासाठी उमेदवार कोण असेल? या प्रश्नाचं उत्तर देशात सर्वाधिक ८० खासदार असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं नाव यात आघाडीवर आहे. यूपीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आता त्यांची जागा आणखी भक्कम झाली आहे. त्यात आता योगींना संसदीय कार्यकारणीत जागा मिळाल्यानंतर योगी मोदींच्या मार्गाने वाटचाल करत असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

Web Title: Yogi Adityanath likely to be appointed as a member of BJP's parliamentary board. Candidate for the post of PM after Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.