मोदी-शाह यांच्यानंतर कोण? भाजपकडून भविष्याचे संकेत; 'त्या' नेत्याचं महत्त्व वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 11:30 AM2021-11-08T11:30:38+5:302021-11-08T11:32:27+5:30
भाजपच्या कार्यकारणीत बैठकीत दिसली झलक
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षानं पुढील वर्षी होऊ घातलेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. यासाठी काल भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीतून भाजपनं भविष्याबद्दल स्पष्ट संकेत दिले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं पक्षातलं वाढतं महत्त्व बैठकीत अगदी स्पष्टपणे पाहायला मिळालं.
पुढल्या वर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. मात्र या राज्यांपैकी केवळ एकाच राज्याचे मुख्यमंत्री बैठकीला प्रत्यक्ष हजर होते. योगी आदित्यनाथ यांनी बैठकीला केवळ हजेरीच लावली नाही, तर राजकीय प्रस्तावदेखील मांडला. त्यामुळे पक्षामध्ये आदित्यनाथ यांचं वाढतं प्रस्थ स्पष्टपणे दिसून आलं.
बैठकीसाठी योगी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात आले होते. तर उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. राज्यातील पक्ष मुख्यालयातून त्यांनी ऑनलाईन बैठकीत सहभाग घेतला. या राज्यांचे भाजपचे प्रदेशाध्यक्षदेखील बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. योगी आदित्यनाथ मात्र बैठकीसाठी भाजपच्या मुख्यालयात आले होते.
देशातलं सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. उत्तर प्रदेश हातून जाऊ द्यायचं नसेल, तर योगींची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यामुळेच योगींचं नेतृत्त्व स्वीकारा, असा स्पष्ट संदेश पक्ष नेतृत्त्वानं दिला आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकायची असल्यास उत्तर प्रदेशमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपला उत्तर प्रदेशात धक्का बसल्यास त्याचे परिणाम पुढील लोकसभा निवडणुकीत दिसतील. त्यामुळे उत्तर प्रदेशात योगींची मागे पूर्ण ताकद उभारण्याचं भाजप नेतृत्त्वानं ठरवलं आहे.