यूपीत पुन्हा योगी सरकार, पंजाबमध्ये ‘आप’चा डंका; काँग्रेसला चिंतेत टाकणारा निवडणुकीचा सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 08:38 PM2021-09-03T20:38:54+5:302021-09-03T20:42:49+5:30
उत्तर प्रदेशातील ४५ टक्के लोक भाजपा, योगी सरकारच्या कामकाजावर समाधानी आहेत. तर ३४ टक्के जनता नाराज आहे. लोकशाहीत सरकार इतकीच विरोधकांनी भूमिका महत्त्वाची मानली जाते
नवी दिल्ली – उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर याठिकाणी पुढील वर्षी २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या राज्यात कुणाचं सरकार येईल याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. एबीपी न्यूज सी वोटरनं (ABP C voter Survey) याबाबत एक सर्व्हे केला आहे. ज्यात उत्तर प्रदेशातभाजपाचा दणदणीत विजय मिळताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात २५९ ते २६७ जागांवर भाजपा विजयी होईल असा दावा यात करण्यात आला आहे. तर समाजवादी पक्षाला १०९-११७ जागा मिळण्याची शक्यता आहे. बीएसपी १२-१६, काँग्रेस ३-७ आणि इतरांना ६ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातील ४५ टक्के लोक भाजपा, योगी सरकारच्या कामकाजावर समाधानी आहेत. तर ३४ टक्के जनता नाराज आहे. लोकशाहीत सरकार इतकीच विरोधकांनी भूमिका महत्त्वाची मानली जाते. अशावेळी लोकांना विरोधी पक्षांनी त्यांची भूमिका योग्यपणे निभावली का? असा प्रश्न करण्यात आला त्यावर ४० टक्के लोकांनी विरोधकांच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले तर ३४ टक्के जनता असमाधानी असल्याचं समोर आलं.
तर उत्तर प्रदेशच्या शेजारील उत्तराखंडमध्येही पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. याठिकाणी ४४ ते ४८ जागा भाजपा जिंकतील, काँग्रेस १९ ते २३, आम आदमी पार्टी ० ते ४ तर इतरांना ०-२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्याच्या कामकाजावर ३६ टक्के जनतेने समाधान व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ३८-४६ जागा मिळण्याची आशंका आहे. तर अरविंद केजरीवालांच्या आपला ५१ ते ५७ जागा मिळतील असा अंदाज आहे.
सर्व्हेनुसार, पंजाबमध्ये १८ टक्के लोक कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहण्यास इच्छुक आहे. तर २२ टक्के लोक अरविंद केजरीवाल, १९ टक्के सुखबीर बादल तर १६ टक्के भगवंत मान आणि १५ टक्के नवज्योत सिंग सिद्धु आणि १० टक्के अन्य चेहऱ्याला मुख्यमंत्री म्हणून पसंती देत आहेत. तर गोवा इथं भाजपाला ३९ टक्के, काँग्रेस १५ टक्के, आप २२ टक्के आणि अन्य २४ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. गोव्यात पुन्हा एकदा भाजपाचा बोलबोला दिसेल. भाजपाच्या खात्यात २२ ते २६ जागा मिळण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीला ४-८ जागा मिळतील तर इतरांना ३-७ जागा मिळण्याची शक्यता आहे. मणिपूर इथं भाजपाच्या खात्यात ४० टक्के मतदान होईल असा अंदाज आहे. त्याशिवाय काँग्रेसला ३५ टक्के, एनपीएफ ६ टक्के आणि इतरांना १७ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे.