योगींच्या दौ-यातून एसी, भगवे टॉवेल, सोफा हद्दपार
By admin | Published: July 13, 2017 05:21 PM2017-07-13T17:21:40+5:302017-07-13T18:12:33+5:30
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या दौ-यामध्ये एसी, भगवे टॉवेल, सोफा आणि रेड कार्पेट या वस्तूंवर बंदी घातली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 13 - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या दौ-यामध्ये एसी, भगवे टॉवेल, सोफा आणि रेड कार्पेट या वस्तूंवर बंदी घातली आहे. योगी आदित्यनाथ यापुढे एखाद्याच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी जातील त्यावेळी एसी, भगवे टॉवेल, सोफा आणि रेड कार्पेट या वस्तू दिसणार नाहीत. अशा प्रकारचा थाटमाट दाखवू नका अशी सक्त ताकीदच योगींनी आपल्या अधिका-यांना दिली आहे. जर कोणी आदेशाचे उल्लंघन केले तर, शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे योगींनी बजावले आहे.
आम्हाला जमिनीवर बसायची सवय आहे. राज्यातील जनतेला त्यांचा सन्मान राखला जातोय असे वाटले पाहिजे तरच, मुख्यमंत्री आदराला पात्र ठरतो असे योगी मागच्या महिन्यात म्हणाले होते. योगी आदित्यनाथ यांनी मागच्या काही महिन्यात शहीद जवानांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी योगी यांच्यासाठी खास एसी, भगवे टॉवेल, सोफा आणि रेड कार्पेट अशी व्यवस्था करण्यात आली होती.
हा जो थाट-माट ठेवण्यात आला होता. त्यावरुन मोठा वाद झाला होता. अलीकडे एका भेटीच्यावेळी रेड कार्पेट, विशिष्ट रंगाचा टॉवेल, सोफा अशी व्यवस्था करण्यात आली होती ते योगींना अजिबात आवडलेले नाही असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये. लोकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्या अशा स्पष्ट सूचना सरकारी वरिष्ठ अधिका-यांना देण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा
मागच्या शुक्रवारी योगींनी काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी रेड कार्पेट अंथरण्यात आले होते. भगवे पडदे, कुलर, फॅन, सोफा अशी व्यवस्था करण्यात आली होती. योगी तिथे पोहोचल्यानंतर हा सर्व थाट-माट पाहून प्रचंड संतापले. त्यांनी शहीद जवानाच्या कुटुंबाला 6 लाख रुपये दिले.
दोन महिन्यांपूर्वी मे महिन्यात योगींनी शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबाची भेट घेतली. मुख्यमंत्री भेटीसाठी येणार म्हणून स्थानिक प्रशासनाने प्रेम सागर यांच्या घरात एसी, कार्पेट, सोफा आणि टॉवल आदी साहित्याची व्यवस्था केली होती. कुटुंबियांची भेट घेऊन योगी माघारी फिरताच लगेचच प्रशासनाने या सर्व वस्तू उचलून घराबाहेर नेल्या.