नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. कृषी कायद्यांवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. तसेच चीनच्या मुद्यावरून सवाल विचारणारे भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनाही राहुल गांधी यांनी टोला लगावला आहे. तसेच केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात "खेती का खून" नावाने एक बुकलेट जारी केलं आहे. यानंतर आता केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींवर पलटवार केला आहे.
केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बुधवारी चर्चेची दहावी फेरी होणार आहे. "कोणत्याही परिस्थितीत ही चर्चा यशस्वी होऊ नये असा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा निघावा अशी काँग्रेसची इच्छा नाही. काँग्रेसला खून या शब्दाबाबत जास्त प्रेम आहे. तुम्ही खेती का खून असं म्हणत आहात, पण तुम्ही देशाच्या विभाजनावेळी हत्येचा खेळ खेळला, त्यावेळी लाखो लोकांचा मृत्यू झाला, ती हत्या नव्हती का?" असा सवाल विचारत जावडेकर यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे.
"काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे की, 4-5 परिवार देशावर हावी आहेत. पण असं नाही, देशावर आता कोणत्याही परिवाराची सत्ता नाही. देशावर 125 कोटी जनतेचं राज्य आहे आणि हे परिवर्तन मोदी सरकारमध्ये झालं असल्याचा टोलाही जावडेकर यांनी लगावला आहे. काँग्रेसने देशावर तब्बल 50 वर्षे राज्य केलं. तेव्हा एकाच परिवाराची सत्ता होती. आज देशाचा शेतकरी गरीब आहे तर तो कुणाच्या नितीमुळे? काँग्रेसने 50 वर्षे विनाशकारी निती अवलंबल्यामुळेच देशातील शेतकरी गरीब राहीला. त्याच्या उत्पादनाला कधीच योग्य भाव दिला गेला नाही" असं देखील प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
‘’जे.पी. नड्डा आहेत कोण? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी का देऊ’’, राहुल गांधींची बोचरी टीका
भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी चीनच्या विषयावरून राहुल गांधी यांनी खोटं बोलणं बंद करावं, असा सल्ला देत नड्डा यांनी काही प्रश्न विचारले होते. त्याबाबत राहुल गांधीना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, जे. पी. नड्डा हे काय माध्ये शिक्षक आहेत का. ते कोण आहेत ज्यांच्यासाठी मी उत्तरं देत फिरू. मी देशातील शेतकरी, देशातील जनतेला उत्तरे देईन. आपला आवाज उठवत राहीन. मग मला कितीही विरोध झाला तरी चालेल. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टोला लगावला. पंतप्रधानांपेक्षा अधिक समज ही देशातील शेतकऱ्यांना आहे. काय चाललंय आणि काय नाही हे त्यांना समजतं. हेच सत्य आहे आणि यावरील एकमेव उपाय म्हणजे तीनही काळ्या कायद्यांना मागे घ्यावं, असे राहुल गांधी म्हणाले. ज्यावेळी यूपीएचं सरकार सत्तेवर होतं, तेव्हा या सरकारने शेतकऱ्यांचं लाखो कोटींचं कर्ज माफ केलं होतं. भट्टा परसोलचा विषयसुद्धा यूपीए सरकार सत्तेत असतानाच उपस्थित करण्यात आला होता, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.