लखनौ - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियाना’ची सुरुवात केली. कोरोना आणि लॉकडाऊनदरम्यान स्थलांतरीत झालेल्या मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासोबत उद्योगांना प्रोत्साहन देणे हे या अभियानाचे उद्दीष्ट आहे. या अभियानातून सुमारे सव्वा कोटी लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या अभियानाचे औपचारिक उदघाटन करताना मोदींनी काही मजुरांशी संवाद साधला.
यादरम्यान, गोंडा येथील विनिता या महिलेशी मोदींनी बातचीत केली. त्यावेळी विनिता यांनी सांगितले की, मी काही महिलांसोबत मिळून एक गट स्थापन केला आहे. आम्हाला प्रशासनाकडून याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही हे काम सुरू केले. पुढे आम्ही नर्सरी सुरू केली. आता आमच्या गटाकडे वर्षाला सहा लाख रुपयांपर्यंत बचत होते.
त्याशिवाय मोदींनी बहराइच येथील तिलकराम यांच्याशी चर्चा केली. शेतकरी असलेल्या तिलकराम यांच्याशी बोलताना मोदींनी त्यांच्या मागे तयार होत असलेल्या घराविषयी विचारले तेव्हा तिलकराम यांनी सांगितले की, ‘’हे घर तुमचंच आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आम्हाला ते मिळालं आहे. आधी आम्ही झोपडीत राहायचो. मात्र आता घर तयार होत असल्याने कुटुंब खूप आनंदात आहे.’’
तेव्हा मोदी तिलकराम यांना म्हणाले की, तुम्हाला घर मिळालं. मग आता मला काय देणार? त्यावर तिलकराम म्हणाले की, तुम्ही आजन्म पंतप्रधान राहावे, हीच आमची इ्च्छा आणि प्रार्थना आहे. तिलकराम यांच्या या उत्तराला मोदींनी हसून प्रत्युत्तर दिले. तसेच मुलांना खूप शिकवा आणि मला दरवर्षी पत्र लिहून मुलांच्या शिक्षणाबाबत माहिती द्या असे सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या