नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनीबिहारमधील चमखी बुखार या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच, बिहारमधील रुग्णालयात लहान मुलांचा झालेला मृत्यू हा आपल्यासाठी लाजीरवाणी बाब असल्याचे मोदींनी म्हटले. तसेच या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मी बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून आरोग्यमंत्रीही पाठपुरावा करत असल्याचे मोदींनी म्हटले.
बिहारमधील मुझफ्फरपूर आणि आससापच्या परिसरात मेंदुज्वर (एईएस) या आजाराने थैमान घातले. यामध्ये आतापर्यंत जवळपास सव्वाशेहून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 95 पेक्षा अधिक बालकांचे मृतदेह एकट्या मेडीकल कॉलेजमधून बाहेर काढण्यात आले. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक्यूट इन्सेफेलाइटीस सिंड्रोममुळे दररोज 8 ते 9 मुलांचा मृत्यू होत आहे. केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांनीदेखील मुजफ्फरपूरमधील मेडीकल कॉलेजला भेट दिली. त्याचवेळी निशा नावाच्या एका चिमुरडीने अखेरचा श्वास घेतला होता.
सोशल मीडियावरही बिहारमधील चमखी बुखारवरुन सरकारला मोठ्या प्रमाणात धारेवर धरण्यात आले. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिखर धवनसाठी ट्विट करायला वेळ आहे. मात्र, बिहारमधील चिमुकल्यांच्या मृत्यूबाबत एक अक्षरही मोदी करत नाही, असे नेटीझन्स विचारत होते. त्यातच, संसदेच्या सभागृहातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्याचाच, उल्लेख करत मोदींनी बिहारमधील बालकांच्या मृत्युबाबत शोक व्यक्त करत, आपल्याला लाज वाटायला हवी असे म्हटले आहे.
दरम्यान, लहान मुलांसाठी यमदूत बनलेल्या या आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात उदासीनता दाखवल्याचा आरोप करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबै आणि बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांचे नावही आहे.