नोटाबंदी : तुमको भूला ना पायेंगे...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 06:32 AM2017-11-08T06:32:47+5:302017-11-08T06:54:32+5:30
८ नोव्हेंबर २०१६... वेळ संध्याकाळची... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला... नव्हे एक निर्णय जाहीर केला. त्या निर्णयाने देशाचेच नव्हे, तर घराघरांचे ‘अर्थ’चक्र अचानक उलटे फिरल्यासारखे झाले.
८ नोव्हेंबर २०१६... वेळ संध्याकाळची... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला... नव्हे एक निर्णय जाहीर केला. त्या निर्णयाने देशाचेच नव्हे, तर घराघरांचे ‘अर्थ’चक्र अचानक उलटे फिरल्यासारखे झाले. काही क्षणापूर्वी ज्या ५०० आणि १०००च्या नोटांना ‘किंमत’ होती, त्या नोटांची किंंमत क्षणार्धात संपली. गृहिणींनी जमवलेल्या पैशांचे डबे फोडले. नोटा बदलण्यासाठी बँकांबाहेर
रांगा लागल्या. त्यात काहींचा जीव गेला. हे सर्व सुरू होते, ते काळा पैसा बाहेर काढण्यासाठी. आज या निर्णयाला वर्ष होत आहे. या वर्षभरात सर्वसामान्यांनी काय सोसले, काय कमावले, काय गमावले, याचा घेतलेला हा प्रतिक्रियात्मक धांडोळा...
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सोशल मीडियावर या निर्णयाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. ‘८ नोव्हेंबर’ ही तारीख जसजशी जवळ येते, त्याप्रमाणे आता लवकरच नवा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करतील, असे मेसेज फिरत आहेत. याशिवाय, मोदींच्या भाषणाची ‘मित्रों’ ही शैलीही ट्रेंडमध्ये आहे. त्या दिवसाची आठवण करून देणारी ‘तुमको भूला ना पायेंगे’ या आशयाची पोस्ट व्हायरल झाली आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर यू-ट्यूबवर ‘बँकवाले बाबू मेरा छुट्टा करा दो’ या गाण्याने एकच धुमाकूळ घातला होता. त्यात बँकांमधील
रांगा, एटीएमच्या बाहेरील गर्दी आणि नाक्या-नाक्यावरील नोटाबंदीची चर्चा सलग दोन-तीन महिने लक्षवेधी ठरली. अक्षरश: सोशल मीडियाच्या इतिहासातही पहिल्यांदाच एवढा मोठा विषय इतका काळ सामान्यांपासून ते अगदी उच्चपदस्थ अधिकाºयांपर्यंत सर्वांच्या चर्चेत राहिला.
या घटनेला आज वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअॅप, फेसबुक, टिष्ट्वटरवर जुन्या ५००, १०००च्या नोटांचे फोटो दाखवून ‘तुमको भूला ना पायेंगे’ अशी पोस्ट व्हायरल झाली आहे. वर्षभरानंतर सोशल मीडियावर पुन्हा नोटांबदीच्या निर्णयाची खुमासदार चर्चा नेटिझन्स चवीने करत आहेत.
मुलीच्या लग्नावर नोटाबंदीचे विघ्न
गणेशोत्सवादरम्यान मुलीचे लग्न आले. १८ डिसेंबर २०१६ रोजी लग्नाची तारीख ठरवल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात होते. मात्र ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय झाला आणि गोंधळ उडाला. हॉलपासून कॅटरिंगपर्यंत प्रत्येक जण जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार देत होता. याउलट घरात लग्नकार्यासाठी ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बँकेतून काढून आणल्या होत्या. आम्ही रोज सकाळी उठून बँकेबाहेर रांगा लावू लागलो. खूप मनस्ताप झाला.
- नवनाथ जगदाळे, नागरिक, भायखळा
हॉटेल व्यवसायाला मोठा फटका
गेल्या काही वर्षांमध्ये हॉटेल
इंडस्ट्रीने नोटाबंदीनंतर २०१६मध्ये पहिल्यांदाच नाताळ आणि नव्या वर्षाच्या सेलिबे्रशनच्या काळात तोट्यातला व्यवसाय केला. नोटाबंदीनंतर पुढचे तीन महिने हॉटेल व्यवसाय मंदीत होता. त्यानंतर जुलैमध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर पुन्हा व्यवसाय कोलमडला. हॉटेल व्यावसायिकांना सरासरी तब्बल ३० टक्के आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
- दिलीप दातवानी, अध्यक्ष, हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडिया