रांची - प्रेमाला कुठलेही बंधन नसल्याचे मानले जाते. असाच एक प्रकार झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील बाघमारा ठाणे क्षेत्रातून समोर आला आहे. येथे गुरू आणि शिष्या एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनीही लग्न केले. मात्र दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने मुलीचे नातेवाईक लग्नाला परवानगी देत नव्हते. मात्र प्रियकराच्या कुटुंबीयांनी मुलाची आवड मान्य केली आहे.
बाघमारा ठाणे क्षेत्रातील सदरयाडीह येथे राहणारी मनीषा कुमारी ही तरुणी हरियाणामधील राहुल चौरसिया याच्याकडे ट्युशनसाठी जात होती. यदरम्यान, हे दोघेही प्रेमात पडले. त्यानंतर जून २०२१ मध्ये या दोघांनी कोर्ट मॅरेज केले. मात्र कोर्ट मॅरेजची माहिती या दोघांनी कुटुंबीयांपासून लपवून ठेवली.
रविवारी प्रेयसीने प्रियकराच्या सांगण्यावरून घरातून पलायन केले आणि ती बाघमारा पोलीस ठाण्यात पोहोचली. तिथे तिने बाघमारा पोलिसांना तिच्या कोर्ट मॅरेजचे प्रमाणपत्र दाखवले आणि संरक्षणाची मागणी केल. त्यानंतर पोलिसांनी याबाबतची माहिती तरुणीच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर सदर तरुणीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत या विवाहाला विरोध केला. मात्र सदर तरुणी ऐकायला तयार झाली नाही.
प्रियकर आणि प्रेयसी दोघेही एकत्र राहू इच्छित होते. त्यांनी लग्नही केले. तसेच पोलिसांना कोर्ट मॅरेजचे प्रमाणपत्रही दाखवले. ते सज्ञान असल्याचे सांगत त्यांनी आपल्या भविष्याचा स्वत:च निर्णय घेण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. अखेर मुलीच्या कुटुंबीयांकडून असलेला विरोध झुगारत पोलिसांनी सदर मुलीला प्रियकरासोबत जाऊ दिले.