श्रीनगर: इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू ऍण्ड काश्मीरचा कमांडर इशफाक अहमद सोफीचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. झाकीर मूसासोबतच सोफी इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू ऍण्ड काश्मीरच्या (आयएसजेके) प्रमुख कमांडरपैकी एक होता. झाकीर मूसाला पकडण्यात अद्याप सुरक्षा दलांना यश आलेलं नाही. तो पंजाबमध्ये लपल्याचं वृत्त गेल्याच आठवड्यात आलं होतं. इशफाक अहमद सोफी जम्मू-काश्मीरच्या सोपोरचा रहिवासी होता. शोपियामध्ये झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा करण्यात आला. तो दहशतवाद्यांमध्ये अब्दुल्ला भाई नावानं ओळखला जायचा. त्याच्याकडून शस्त्रसाठादेखील जप्त करण्यात आला. सोफीला ठार करण्यात यश आल्यानंतर सोपोरच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी परिसरातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्याचे आदेश दिले. आज पहाटे सोपोरच्या अमशीपोरात सुरक्षा दलांची चकमक झाली. त्यात सोफीला कंठस्नान घालण्यात आलं. सोफी आयएसजेकेचा कमांडर होता. त्याच्याकडे काश्मीरमधल्या कारवायांची जबाबदारी होती. 2015 मध्ये तो हरकत-उल-मुजाहिदीन संघटनेसोबत काम करत होता. त्यानंतर तो 2016 मध्ये त्यानं आयएसजेकेमध्ये सामील झाला. याआधी सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत बुरहान वाणी गँगचा शेवटचा कमांडर लतिफ टायगर मारला गेला.
काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; इस्लामिक स्टेटचा कमांडर ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 11:36 AM