कोलकाता : आठवडाभरापूर्वीच एका ग्राहकाला दुसऱ्य़ा समाजाचा डिलिव्हरी बॉय नको होता म्हणून या ग्राहकाने ऑर्डर रद्द केल्याचा वाद शमत नाही तोच झोमॅटो पुन्हा नव्या वादात सापडला आहे. पश्चिम बंगालमध्येझोमॅटोविरोधात त्यांचे डिलिव्हरी बॉयनीच गेले आठवडाभरापासून आंदोलन छेडले आहे.
झोमॅटोने पश्चिम बंगालमध्ये बीफ आणि डुकराचे मटणाची डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे झोमॅटोवर कर्मचारी नाराज झाले आहेत. या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की, कंपनी त्य़ांना धर्माविरोधात असलेल्या गोष्टी डिलिव्हरी करायला सांगत आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावत आहेत. या कर्मचाऱ्यांकडून झोमॅटो बीफ, डुकराचे मांसाचे पदार्थ जबरदस्तीने डिलिव्हर करण्यास लावले जात आहेत. कंपनी कर्मचाऱ्य़ांच्या मागण्या ऐकत नाहीय. याविरोधत गेल्या आठवड्यापासून आंदोलन छेडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांच्या दोन मागण्या आहेत. पहिली अशी की, कंपनीने कर्मचाऱ्यांच्या धार्मिक भावनांशी कोणत्याही प्रकारचा खेळ करू नये. दुसरी पगारवाढीची आहे. याबाबत य़ा कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले आहे, मात्र त्यांच्याकडून अद्य़ाप कोणताही प्रतिसाद आलेला नाही, असे या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात 31 जुलैला डिलीव्हरी बॉय हिंदू नसल्यानं ऑर्डर रद्द करणाऱ्या ग्राहकाला झोमॅटोनं सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे झोमॅटोचे संस्थापक दिपिंदर गोयल यांनीही ट्विट करत आपल्याला आयडिया ऑफ इंडियाचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं. आम्ही व्यवसाय करताना मूल्यं पाळतो, अशी भावना त्यांनी ट्विटमधून व्यक्त केली होती.
अमित शुक्ला नावाच्या एका व्यक्तीनं ट्विट करत आपण झोमॅटोवरुन केलेली ऑर्डर रद्द केल्याचं म्हटलं. 'त्यांनी (झोमॅटोनं) माझ्या ऑर्डरची जबाबदारी हिंदू नसलेल्या रायडरकडे दिली. रायडर बदलणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. मी ऑर्डर रद्द केल्यास भरलेले पैसे परत मिळणार नाहीत, असं ते म्हणाले. हाच डिलीव्हरी बॉय तुमच्याकडे जेवण घेऊन येईल, अशी सक्ती तुम्ही मला करू शकत नाही, असं मी त्यांना सांगितलं. तुम्ही पैसे परत करू नका. पण ऑर्डर रद्द करा,' असं ट्विट शुक्ला यांनी केले होते. यानंतर झोमॅटोवर नेटिझन्सनी टीकेची झोड उठविली होती. तर अनेकांनी झोमॅटोची बाजुही घेतली होती.