नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून अतिशय झपाट्यानं वाढत आहे. काल देशात पहिल्यांदा ३ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये आता कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. याशिवाय कोरोना लसीकरणाला गती देण्याचं कामदेखील सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता झायडस कॅडिलानं तयार केलेल्या कोरोनावरील औषधाच्या वापरास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (डीजीसीआय) परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच झायडस कॅडिला कंपनीच्या विराफिन औषधाचा वापर सुरू होईल. सध्याच्या घडीला देशात कोवॅक्सिन, कोविशील्ड लसींचा वापर सुरू आहे. तर पुढील काही दिवसांत स्पुटनिकची लसदेखील भारतात उपलब्ध होणार आहे. त्यानंतर आता विराफिनच्या वापरासदेखील परवानगी मिळाली आहे.सध्या देशात दोन लसींचा वापर सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लसीकरण महत्त्वाचं ठरत आहे. तर विराफिनचा वापर कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये करता येईल. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर विराफिनच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून हाती आलेले निष्कर्ष उत्तम आहेत. कोरोना रुग्णांच्या उपचारात विराफिनचा वापर केल्यास अवघ्या ७ दिवसांत ९१.१५ टक्के रुग्णांचे आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा झायडसनं केला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना लवकर बरे करण्यात आणि ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगानं कमी करण्यात विराफिन उपयोगी ठरेल.ना रेमडेसिविर, ना महागडी औषधे; तरीही रुग्ण होताहेत ठणठणीत बरे!कोरोना रुग्णांना सुरुवातीच्या कालावधीत विराफिन दिलं गेल्यास रुग्ण अधिक लवकर बरा होतो. त्याला होणारा त्रासदेखील कमी होतो, असा झायडस कॅडिला कंपनीचा दावा आहे. हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानं देण्यात येईल. ते सुरुवातीला केवळ रुग्णालयांमध्ये उपलब्ध असेल. देशाच्या सध्याच्या घडीला २४ लाख २८ हजार ६१६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल आणि परवा देशात ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानं देशातील आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आहे. अनेक रुग्णालयांची क्षमता संपली आहे. अशा परिस्थितीत रुग्ण लवकर बरे झाल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊ शकतो. त्या दृष्टीनं झायडसच्या विराफिनला मिळालेली परवानगी महत्त्वाची आहे.