चार वर्षात ११ लाख पर्यटकांची भेट
By admin | Published: November 16, 2016 04:44 AM2016-11-16T04:44:47+5:302016-11-16T04:44:47+5:30
महापालिकेच्या नेरूळमधील वंडर्स पार्कला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळू लागली आहे. चार वर्षांमध्ये १० लाख ८५ हजार पर्यटकांनी भेट
नवी मुंबई : महापालिकेच्या नेरूळमधील वंडर्स पार्कला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळू लागली आहे. चार वर्षांमध्ये १० लाख ८५ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. लग्न व इतर कार्यक्रमांसाठीही हजारो नागरिक उपस्थित राहत असतात. शहरातील विरंगुळ्याचे प्रमुख केंद्र म्हणून हे उद्यान ओळखले जात असून उद्घाटनापासून प्रवेश शुल्क व हायटेक राईडच्या माध्यमातून तब्बल साडेपाच कोटी रुपये महसूल संकलित झाला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या वंडर्स पार्कचे उद्घाटन डिसेंबर २०१२ मध्ये झाले. पहिल्या दिवसापासून उद्यानाला भेट देण्यासाठी शहरवासीयांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. गतवर्षी उद्यानांमधील गैरसोयींमुळे पालिकेवर प्रचंड टीका झाली होती. येथील तलावामधील पाणी आटले होते. कारंजे बंद होते. ट्रॅफिक गार्डनचा काहीही उपयोग होत नव्हता. राईडचे आकर्षण संपल्याने त्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली होती. टॉय ट्रेन हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला होता. याविषयी प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने येथील फुडकोर्ट सुरू केले आहे. अॅम्फी थिएटर व बाजूची मोकळी जागा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्यास सुरुवात झाली आहे. तीन नवीन राईड सुरू केल्या आहेत. यामुळे उद्यानाला भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. दिवाळीमध्ये उद्यानामध्ये गर्दीचा उच्चांक होऊ लागला होता. अनेक वेळा राईडची तिकीटविक्री करण्यासाठी वाढीव खिडक्या सुरू कराव्या लागल्या होत्या.
उद्यान सुरू झाल्यापासून आतापर्यंत ८ लाख ५२ हजार प्रौढ नागरिक व २ लाख ३३ हजार लहान मुलांनी उद्यानास भेट दिली आहे. याशिवाय जवळपास एक हजार नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम व लग्नसमारंभांमुळे वर्षभरात जवळपास ५० ते ६० हजार नागरिक उद्यानाला भेट देत आहेत. हायटेक राईडपेक्षा लहान मुलांची टॉयट्रेनला पसंती मिळू लागली आहे. ३ लाख ४३ हजार नागरिकांनी टॉयट्रेनवरून सवारीचा आनंद घेतला आहे. उद्यानामधील गैरसोयी बऱ्यापैकी कमी झाल्या असून नवीन खेळणी व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)