पनवेल ते रसायनी २५ मिनिटांच्या प्रवासाला खड्ड्यांमुळे लागतो १ तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 02:52 AM2020-11-28T02:52:09+5:302020-11-28T02:52:27+5:30
राज्य मार्ग क्रमांक १०५ची दुरवस्था, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
वैभव गायकर
पनवेल: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारा राज्य मार्ग क्रमांक १०५ हा खड्ड्यांमुळे चर्चेत आहे. येथून प्रवास करताना वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पनवेल-रसायनी या दोन शहरांना जोडणाऱ्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करून रस्त्याची डागडुजी केली जाते. मात्र
पुन्हा परिस्थिती जैसे थेच आहे. अवजड वाहनांची या ठिकाणी मोठी वर्दळ असते. तसेच या मार्गालगतच मोठ्या प्रमाणात गावे वसलेली असल्याने येथील रहिवासी या मार्गावरून ये-जा करीत असतात. २० ते २५ मिनिटांचा कालावधी गाठण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे ते १ तास लागत असल्याने वाहनचालकांचा वेळ आणि इंधनही वाया जात आहे. रसायनीत असलेल्या आद्योगिक वसाहतीमुळे नोकरदार याच मार्गावरून प्रवास करतात. मनेसेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात जाब विचारण्यासाठी निवेदनही दिले गेले होते. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य संदीप भगत हे मागील अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र केवळ आश्वासने देण्यात येतात. येथील खड्ड्यांमुळे अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. दहा किमीच्या या मार्गावर पथदिवेदेखील नसल्याने अपघातांचा धोका अधिक असतो.
अनेक वेळा तक्रारी करूनदेखील काहीच उपयोग होत नाही. आजवर अनेक वेळा या ठिकाणी अपघात घडले आहेत. तरी काहीच उपाययोजना होत नाही. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर तात्पुरती डागडुजी केली जाते. पावसाळ्यात या मार्गावर पुन्हा खड्डे पडतात. वर्षभर याच खड्ड्यांतून मार्ग काढत प्रवास करावा लागतो.
- नंदकिशोर माळी , वाहन चालक
नागरिक करतात पर्यायी मार्गाचा वापर
कोन-सावळा मार्गाच्या दुरवस्थेमुळे अनके वाहनचालक शेडुंग फाटा येथे टोल भरून पर्यायी मार्गाचा वापर करीत आहेत. रसायनीत असलेल्या पिल्लई महाविद्यालयात मुंबई उपनगरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. अशा विद्यार्थ्यांनादेखील या खराब मार्गाचा फटका बसतो.
महामार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ
पनवेल-रसायनीला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत हा रस्ता आहे. येथे यापूर्वी टोल वसुली होत असे तेव्हा मार्ग सुस्थितीत होता. टोल बंद झाल्यापासून खड्ड्यांची मालिका सुरूच आहे. या मार्गावर सतत अवजड वाहनांची येजा असते. भविष्यात आणखी वाहनांचा वर्दळ वाढणार आहे. हे लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
कोन-सावळा या मार्गाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पूरहानी दुरुस्ती अंतर्गत शासनाकडे पाठविला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित निविदा काढून रस्त्याची डागडुजी करण्यात येईल. सलग दोन वर्षे झालेल्या अतिवृष्टीमुळे या मार्गाची दुरवस्था झाली असून यासंदर्भात प्रस्ताव मंजुरीसाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.
- नितीन भोये , उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल