लॉकडाऊनच्या काळात 29 लाख नागरिकांची एपीएमसीत चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 02:36 AM2020-11-28T02:36:43+5:302020-11-28T02:36:54+5:30
प्रतिदिन ८०० नागरिकांची कोरोना टेस्ट : प्रत्येकाच्या प्राथमिक तपासणीवर भर
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना पसरण्याचा सर्वाधिक धोका असल्यामुळे प्रशासनाने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत मार्केटमध्ये २९ लाख ३७ हजार ६७७ नागरिकांची ऑक्सिजन पातळी व तापमानाची तपासणी करण्यात आली आहे. प्रतिदिन १७ ते २० हजार नागरिकांची प्राथमिक तपासणी होत असून ७०० ते ८०० जणांची कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोना काळात मुंबई, नवी मुंबईमधील जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी बाजार समितीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पाचही मार्केट सुरू ठेवल्यामुळे दीड कोटी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वेळेवर पोहोचविता आल्या. बाजार समितीमुळे नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा आक्षेप घेण्यात आल्यामुळे मार्केट बंद करण्यासाठी दबाव येऊ लागला होता. प्रशासनाने प्रत्येक मार्केटमध्ये कोरोना नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली. मार्केटमध्ये येणाऱ्या वाहनांच्या संख्येवरही नियंत्रण ठेवण्यात आले. मार्केटमध्ये येणाऱ्या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यावर भर देण्यात आला. प्रवेशद्वारावर तपासणी केंद्र सुरू केले असून . प्रत्येक दिवशी १७ ते २० हजार नागरिकांचे तापमान तपासले जात आहे. ज्यांचे तापमान व ऑक्सिजन पातळी योग्य नाही त्यांची तत्काळ कोरोना चाचणी करण्याची सुविधा मार्केटमध्ये उपलब्ध केली आहे. याशिवाय स्वेच्छेेने ज्यांना तपासणी करायची आहे त्यांनाही चाचणीची सुविधा दिली आहे.
बाजार समिती प्रशासनाने पुरेशी काळजी घेतल्यानंतरही अनेक व्यापारी, कामगार व ग्राहक मास्क वापरत नाहीत, साेशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक तयार केले आहे. या पथकाकडून नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. प्रवेशद्वारावर सॅनेटायझरही उपलब्ध करून दिले आहे.
बाजार समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची तापमान व ऑक्सिजन पातळी तपासली जात आहे. प्रत्येक मार्केटमध्ये कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध केली आहे. नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती केली असून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. - अशोक डक,
सभापती, मुंबई बाजार समिती