- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कर्नाटक येथून नवी मुंबईत विक्रीसाठी आणलेली स्टार प्रवर्गातील 293 कासवे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल गुप्त वार्ता, वन्यजीव अपराध नियंत्रण कक्ष व वन्यपरिक्षेत्र विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.वाशी येथे काही व्यक्ती मोठ्या संख्येने कासवे घेऊन येणार असल्याची माहिती महसूल गुप्त वार्ता विभागाच्या अधिका-यांना मिळाली होती. त्यानुसार पी. थॉमस, हर्षद सावंत, राहुल सोनवणो तसेच वन्यजीव रक्षक सुनीष कुंजू यांनी वाशी प्लाझा परिसरात शनिवारी दुपारी सापळा रचला होता. या वेळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या शिवनेरी बसमधून उतरलेल्या दोघांवर त्यांना संशय आला. यानुसार त्यांच्याकडील बॅगांची झडती घेतली असता, त्यामध्ये मोठय़ा संख्येने कासवे आढळून आली. त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे स्टार प्रवर्गातील लहान-मोठी 293 कासवे आढळून आली. वन्यजीव अपराध नियंत्रण कक्षाच्या तक्रारीनुसार दोघांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. श्रीकांत लिंगाराजू (20) व कोंडिया लिंगाराजू (27) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही मूळचे कर्नाटकचे राहणारे आहेत. वाशी पाळीव प्राणी विक्री केंद्र चालक तानाजी कलंगे याला विकण्यासाठी त्यांनी कासवे आणल्याची कबुली दिली. मात्र, कारवाईची माहिती मिळताच तो पळाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.अटक केलेल्या दोघांवर यापूर्वी देखील 900 कासवांच्या तस्करी प्रकरणी कोलकाता पोलिसांनी कारवाई केलेली आहे. त्यानुसार या रॅकेटमध्ये इतरही अनेकांचा सहभाग असल्याची शक्यता वन्यजीव रक्षक सुनीष कुंजू यांनी वर्तवली आहे. हौसेखातर घरामध्ये वापरासाठी अथवा फेंगशुई म्हणून कासवांचा वापर केला जातो. मात्र, कासव पाळण्यास बंदी असतानाही गुप्त धनाच्या प्राप्तीसाठी देखील अनेकांकडून छुप्या मार्गाने कासवांचा वापर केला जातो. त्यानुसार पोलिसांना पाहिजे असलेला तानाजी कलंगे हाती लागल्यास अशा अनेक हौसींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
स्टार प्रजातीची 293 कासवे जप्त, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 7:22 PM