- प्राची सोनवणे, नवी मुंबई
मे महिन्यातील पहिला मंगळवार हा जागतिक अस्थमा दिन म्हणून पाळला जातो. दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येमुळे दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. धुळीचे कण, धूर, फुलांचे परागकण, थंड हवामान, पित्त, मानसिक ताण, व्यायाम, धूम्रपान अशा गोष्टी अस्थमा बळावण्यास कारणीभूत ठरतात. तज्ज्ञांनी केलेल्या निरीक्षणातून शहरात वाढत असलेले वायू प्रदूषण व कबुतरांची वाढती संख्या हे महत्त्वाचे दम्याचे कारण समोर आले आहे. प्रदूषित वातावरणामुळे फुप्फुसांचे आरोग्य बिघडत असून फुप्फुसांच्या आजारांमधील दम्यासारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. दमा या आजाराची मुख्य लक्षणे म्हणजे सतत खोकला येणे, धाप लागणे. याशिवाय श्वासोच्छ्वास करताना शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणे, श्वास बाहेर सोडण्यास त्रास होणे. छातीवर वजन पडल्यासारखे वाटणे. याविषयी अधिक माहिती देताना नवी मुंबईतील ज्येष्ठ छातीविकार तज्ज्ञ डॉ. अभय उपे यांनी कबुतरांच्या सततच्या संपर्कामुळे सर्वच वयोगटातील व्यक्तींना श्वसन विकारांचा त्रास होत आहे. याच जोडीला देवनार येथील डम्पिंग ग्राउंड येथील लागलेल्या आगीमुळे नवी मुंबईमध्ये ३० टक्क्यांनी रु ग्णांमध्ये वाढ झाल्याचे सांगितले. घरातील बाल्कनी व खिडक्या येथील कबुतरांची विष्ठा वाळत घातलेल्या कपड्यांसोबत घरामध्ये येते व त्यामुळे अतिसंवदेनशीलता फुप्फुसाचा दाह निर्देशित करणाऱ्या जीवाणूचा आपल्या शरीरात प्रवेश होतो व त्यामुळे श्वसनाच्या अनेक आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०२० साली भारत ही अस्थमा रु ग्णांची जागतिक राजधानी बनेल, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. भारतातील सहा मुलांपैकी एका मुलाला दम्याचा त्रास जडतो. सीआरएफ या संस्थेने २०१६ साली लहान मुलांच्या आरोग्याची पाहणी केली. हे प्रमाण १६ टक्क्यावर आले असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. २००३ साली हेच प्रमाण २.५ टक्के इतके होते. दूषित हवा, बदलते हवामान, मोठ्या प्रमाणात होणारी बांधकामे या परिस्थितीमध्ये अस्थमा रु ग्णांचा त्रास वाढतो.घ्यावयाची काळजी - मुलाला दम्याचा अॅटॅक आल्यास सरळ बसू द्या. लगेच झोपवू नका. शांत आणि ढिलेपणाने पडायला सांगा. कपडे सैल करा.- डॉक्टरांनी सांगितलेली रिलीव्हर औषधे लगेचच द्या. त्यामुळेही सुधारणा नसेल तर आणखी पाच मिनिटांनी रिलीव्हर औषधं थोड्या प्रमाणात द्या.- तरीही बरं वाटत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.- याशिवाय मुलाला स्वत:ला अस्थमाविषयी औषधं आणि साधनं (इन्हेलर्स, स्पेन्सर्स) कशी वापरावीत, ते शिकवा.- मुलांची खेळणी नीट धुऊन स्वच्छ करता येतील अशीच वापरा.- मांजर, कुत्र्यासारख्या पाळीव प्राण्यांचा सांभाळ जपून करावा.- तुमच्या मुलाच्या कीटमध्ये नेहमीच एक रिलीव्हर हँडी पॅक ठेवा.- दमट जागा जसे की, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, तळघरात हवा खेळत्या हवेसाठी एक्झॉस्ट पंखे लावा.- मुलांसमोर व घरात कटाक्षाने धुम्रपान टाळा. कारण त्याचा धूर बराच वेळ घरात रेंगाळत राहतो.शिशुतज्ज्ञ डॉ. समीर शेख असेही म्हणतात की, लहान वयात दमा होण्याचे प्रमाण जास्त असते. बदलती खाद्यसंस्कृती, प्रदूषण, व्यायामाचा अभाव, कॉम्प्युटर अशा अनेक गोष्टी जबाबदार आहेत. यासाठी पालकांनी वेळीच सावध होणे गरजेचे असून मुलांकडे दुर्लक्ष केल्याने हा आजार वाढू शकतो. मुलांमध्ये दम्याची लक्षणे दिसताच त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.