नवी मुंबई : शहरातील लँडमार्क म्हणून प्रसिद्धीस आलेल्या नेरूळमधील ज्वेल्स आॅफ नवी मुंबईमध्ये शनिवारी रात्री समाजकंटकांनी धुडगूस घातला. मद्यपान करून सुरक्षारक्षकांना दमदाटी करून येथील विजेचे ३५ पोल कापले असून याविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाम बिच रोडवर आतापर्यंत नामदेव भगत तलाव म्हणून ओळख असलेल्या होल्डिंग पाँडचे महापालिकेने सुशोभीकरण केले. ज्वेल्स आॅफ नवी मुंबई म्हणून या परिसराची ओळख शहरभर निर्माण झाली असून दिवसभर हजारो नागरिक येथे भेट देत आहेत. सकाळी व सायंकाळी रोज २ ते ३ हजार नागरिक व्यायामासाठी येथे येऊ लागले आहेत. पालिकेच्या या प्रकल्पाचे सर्वत्र कौतुक होत आहे; पण शनिवारी रात्री मद्यपींनी येथील सुरक्षा रक्षकांना दमदाटी करून लाईट बंद केल्यानंतरही बाहेर जाण्यास नकार दिला. नियमाप्रमाणे लाईट बंद केल्यानंतर त्यांनी रात्री जवळपास ३५ पोल कापले आहेत. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे महापालिकेचे शहर अभियंता मोहन गावकर यांच्यासह अनेक अधिकारी रोज सकाळी व्यायामासाठी येथे येत असतात. हा प्रकार निदर्शनास येताच त्याविषयी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. महापालिकेने या ठिकाणी कॅमेरे बसवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेविका रूपाली किस्मत भगत व शिवसेना नगरसेवक काशीनाथ पवार यांनी केले आहे. भगत यांनी काही दिवसांपूर्वीच पालिकेला पत्रही दिले होते. या ठिकाणी रोज रात्री मद्यपी व इतर समाजकंटक येऊ लागले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
समाजकंटकाने कापले ३५ पोल
By admin | Published: November 14, 2016 4:37 AM