ज्येष्ठांना बेस्ट तिकिटात ५० टक्के सूट, महापौरांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 02:12 AM2017-11-14T02:12:51+5:302017-11-14T02:13:10+5:30
महापालिकेच्या विरंगुळा केंद्रात येणा-या ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनातूच तरुण पिढीला भविष्याची दिशा मिळणार असल्याने, ज्येष्ठ नागरिकच देशाची खरी संपत्ती असल्याचे
मुंबई : महापालिकेच्या विरंगुळा केंद्रात येणा-या ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनातूच तरुण पिढीला भविष्याची दिशा मिळणार असल्याने, ज्येष्ठ नागरिकच देशाची खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांना ‘बेस्ट’च्या बस भाड्यामध्ये यापुढे ५० टक्के सूट देणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सोहळा आणि ज्येष्ठ नागरिकांचा गौरव समारंभ माटुंगा (प)च्या यशवंत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. या वेळी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना महापौर बोलत होते. या प्रसंगी महाडेश्वर यांच्या हस्ते प्रारंभी वयाची ९० वर्षे पूर्ण केलेल्या सखाराम पाताडे, एम. के. फटनाणी, विरप्पा काकनकी, एस. पी. गायकवाड, प्रमिला देशपांडे, सुनंदा बागकर, रामकृष्ण केणी, मधुकर कातकर, कमला वाटणकर, सरिता शहा, जैन नायगण यांचा सत्कार करण्यात आला.
नियोजन विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाºया सोयी-सुविधांचा या वेळी आढावा घेतला. आतापर्यंत महापालिकेने २३ विरंगुळा केंद्रे उभारली असून, २४वे केंद्र हे आर/ दक्षिण विभागात सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, महापौरांच्या अध्यक्षतेखाली लवकरच ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्यात येत असून, वर्षातून संघाच्या दोन बैठका घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.