नवी मुंबई : फटाका विक्रीत यावर्षी कमालीची घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल ७0 टक्के विक्री कमी झाल्याची माहिती फटाका विक्रेत्यांनी दिली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राज्य सरकारने सुरू केलेल्या जनजागृती अभियानाचा फटाका विक्रीवर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीचाही मोठा फटका बसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.दिवाळीत फटाका विक्रीसाठी शहराच्या विविध नोड्समध्ये दरवर्षी जवळपास साडेचारशे स्टॉल्सला परवानगी दिली जाते; परंतु या वर्षी हे प्रमाण निम्म्यावर आल्याचे दिसून आले आहे. यातच नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योग व छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्याचे एकूण परिणाम या उत्सवात दिसून आले. केंद्र व राज्य सरकारने प्रदूषणमुक्त दिवाळीवर भर देत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबविली. शाळांमध्ये जाऊन पर्यावरणाला घातक असलेले फटाके न फोडता, दिवाळीचा आनंद लुटण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. याचा चांगलाच परिणाम या उत्सवाच्या चार दिवसांत दिसून आला. ग्राहकांनी फटाकाविक्रीच्या स्टॉल्सकडे पाठ फिरविल्याने विक्रेत्यांची मोठी पंचाईत झाली. यातच दिवाळीच्या अगदी दोन दिवसांअगोदर परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या सर्वाचा सामूहिक परिणाम म्हणून गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी फटाके विक्रीत जवळपास ७0 टक्क्यांची घसरण झाल्याची माहिती कोपरखैरणे येथील रांजणदेवी फटाका असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ मारुती म्हात्रे यांनी दिली.
फटाक्यांच्या विक्रीत ७0 टक्के घट, पर्यावरणासाठी जनजागृतीचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 2:49 AM