'शासन आपल्या दारी'चा ८५० दिघावासीयांनी घेतला लाभ

By नारायण जाधव | Published: January 20, 2024 07:15 PM2024-01-20T19:15:01+5:302024-01-20T19:15:14+5:30

पहिल्याच दिवशी दिघा विभागातील सकाळच्या सत्रात ३०० हून अधिक तर दुपारच्या सत्रात ५५० हून अधिक नागरिकांनी 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा लाभ घेतला.

850 residents of Digha have benefited from Shasan Aplya Dari | 'शासन आपल्या दारी'चा ८५० दिघावासीयांनी घेतला लाभ

'शासन आपल्या दारी'चा ८५० दिघावासीयांनी घेतला लाभ

नवी मुंबई: योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी' हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शुभारंभ आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दिघा तलावानजीकच्या पटांगणात नागरिकांच्या उपस्थितीत झाला. शासनाच्या योजनांप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या लोककल्याणकारी योजनांचेही माहितीप्रद स्टॉल या ठिकाणी लावले असून त्यांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. पहिल्याच दिवशी दिघा विभागातील सकाळच्या सत्रात ३०० हून अधिक तर दुपारच्या सत्रात ५५० हून अधिक नागरिकांनी 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा लाभ घेतला. काहीजणांनी शासनाच्या व महानगरपालिकेच्या योजनांची माहिती घेतली. तर अनेकांनी अर्ज भरून योजनांचा लाभही घेतला.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या समवेत समाजविकास विभागाचे उपायुक्त किसन पलांडे, परिमंडळ २ चे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, मुख्यमंत्री जनकल्याण योजनेचे शासकीय अधिकारी सुनील आव्हाड, दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड, वैद्यकिय अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर, ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक अहिरे, समाजविकास अधिकारी सर्जेराव परांडे तसेच माजी नगरसेवक नवीन गवते, ॲड. अपर्णा गवते, दीपा गवते आणि वीरेंद्र सिंग व श्री सुरेश पाल उपस्थित होते. कार्यक्रमात दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांच्यासह सर्व उपस्थितांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची सामुहिक शपथ ग्रहण करून आभार प्रदर्शन केले.
 
हा उपक्रम ऐरोली विभागात २३ जानेवारी रोजी, सकाळी ११ ते १ या वेळेत ऐरोली विभाग कार्यालय तसेच दुपारी २ ते ५ या वेळेत नमुंमपा शाळा क्रमांक ५३, चिंचपाडा, ऐरोली या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे २४ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत नमुंमपा शाळा क्रमांक ४८, दिवा, ऐरोली (काचेची शाळा) येथे त्याचप्रमाणे दुपारी २ ते ५ या वेळेत सेक्टर १५, ऐरोली येथे आर. आर. पाटील मैदान येथे होणार आहे.
 

Web Title: 850 residents of Digha have benefited from Shasan Aplya Dari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.