आग लागल्याचे बघायला गेले, शौचालयात बेशुद्ध पडले; वाशीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 08:33 AM2024-11-21T08:33:57+5:302024-11-21T08:35:19+5:30
वाशी सेक्टर १० येथील जेएन ३ मधील १६ क्रमांकाच्या इमारतीत दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.
नवी मुंबई : वाशीतील जेएन टाईप वसाहतीमध्ये एका घरात आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. त्यावेळी शेजारील घरातील वृद्ध आग पाहण्यासाठी आला. अचानक आग वाढल्याने त्यांनी शौचालयात स्वतःला कोंडून घेतले आणि धुरामुळे वृद्ध बेशुद्ध पडले. बाबूराव वाघमारे (६२) असे त्यांचे नाव आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घरात गेले असता बाबूराव वाघमारे शौचालयात बेशुद्धावस्थेत आढळले.
वाशी सेक्टर १० येथील जेएन ३ मधील १६ क्रमांकाच्या इमारतीत दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या नाबा कुमार चक्रवर्ती यांच्या घरात आग लागली होती. आग आटोक्यात येत नसल्याने त्यांनी घराबाहेर पळ काढून अग्निशमन दलाला कळवले.
त्यानुसार यामुळे वाशी अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी रोहन कोकाटे यांच्यासह सहायक अधिकारी रमेश आकरे, निरंजन रोडगे, प्रेमजित तांडेल, स्वप्नील पालेकर, रूपेश कोळी, केतन सोनवणे यांच्या पथकाने त्याठिकाणी धाव घेतली.
एका घरात लागलेली आग शेजारच्या घरांमध्ये देखील पसरत असतानाच अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाकडून घराची पाहणी सुरू होती. त्यावेळी शौचालयात बाबूराव वाघमारे (६२) हे बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत मिळून आले. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळीच मिळालेल्या उपचारामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.
साहित्य जळून खाक
आग लागल्याने ते पाहणी करण्यासाठी त्याठिकाणी गेले असता आग वाढल्याने बचावासाठी त्यांनी स्वतःला शौचालयात कोंडून घेतले. मात्र, आगीमुळे पसरलेल्या धुरामुळे त्याच ठिकाणी ते बेशुद्ध पडले.
दरम्यान, अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवून घराची पाहणी केल्याने ते मिळून आले. या दुर्घटनेमुळे परिसरात काही वेळासाठी भीती पसरली होती. आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.