नवी मुंबई : वाहतूक पोलिसांनी अवघ्या महिनाभरात ४९५ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम राबवला असून यापुढेही कारवाईचा दणका सुरूच राहणार आहे.नवी मुंबईत वाढती अवैध प्रवासी वाहतूक गंभीर दुर्घटनेला निमंत्रण देणारी ठरू शकते. खासगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होत असून, परिणामी आर्थिक फटकाही सोसावा लागतो. अशाच प्रकारच्या तोट्याचा सामना गेली अनेक वर्षांपासून महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला करावा लागत आहे. यामुळे बस, टॅक्सी किंवा जीप अशा खासगी वाहनांमधून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची गरज निर्माण झालेली आहे. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांच्या वतीने २० मार्च ते १५ एप्रिलदरम्यान धडक कारवाईची मोहीम राबवण्यात आली. या कालावधीत एकूण ४९५ वाहनांवर कारवाई केल्याचे वाहतूक विभाग उपायुक्त अरविंद साळवे यांनी सांगितले. तर यापुढे देखील अशा प्रकारच्या खासगी वाहनांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वाहतूक पोलिसांची ४९५ वाहनांवर कारवाई
By admin | Published: April 17, 2016 1:09 AM