महामार्गालगतच्या अतिक्रमणावर कारवाई !
By Admin | Published: November 6, 2016 04:05 AM2016-11-06T04:05:03+5:302016-11-06T04:05:03+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या रूंदीकरणाला अडथळा निर्माण करणाऱ्या महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर लवकरच कारवाईचा बडगा उगारला
पनवेल : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या रूंदीकरणाला अडथळा निर्माण करणाऱ्या महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. महापालिकेच्या वतीने या अतिक्रमणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अतिक्रमणे स्वत:हून काढून टाका, किंवा कारवाईला सामोरे जा, असे निर्देश या नोटीसाद्वारे देण्यात आले आहेत. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वाहतुक कोंडी त्याचबरोबर भविष्याचा वेध घेवून रस्ते विकासमहामंडळाने कळंबोली सर्कल ते कोन या दरम्यान एनएच- महामार्गाचे रूंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कळंबोली अग्निशमन दल, खांदा वसाहत, भिंगारी, काळुंद्रे आणि कोन येथे पूल बांधण्याचे प्रस्तावित आहे. या कामाच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. मात्र महामार्गालगत असलेल्या अतिक्रमणांमुळे या कामाला अडथळा निर्माण होत आहे. यापार्श्वभूमीवर महापालिकेने आता कठोर भूमिका घेत या अतिक्रमणांना नोटीसा बजावल्या आहेत.अनेकांनी या महामार्गालगत बेकायदा दुकाने थाटली आहेत. तर काहींनी हे बेकायदा स्टॉल्स भाडयाने दिले आहेत. त्यावर कलिंगड, पीओपी, फर्निचर, खेळणी,गालीचे विक्र ी करणारे दुकान आणि नर्सरी आदीच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत. खांदा वसाहतीलगत या अतिक्र मणाचे प्रमाण जास्त आहे. महामार्गचे रूंदीकरण करण्याकरीता हे अतिक्र मण हटवणे गरजेचे आहे. त्यासाठी एमएसआरडीसीने खासगी एजन्सी नियुक्त केली आहे. याअगोदर संबधित दुकानदारांना नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. परंतु अतिक्रमणधारकांनी या नोटीसांना कोणताही प्रतिसाद दिला नव्हता.
आयुक्तांच्या आदेशानुसार पनवेल महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या जाणार्या एनएच- मार्गालगतच्या अतिक्रमणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. संबधितांना हे अतिक्रमण स्वत:हून काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार लवकरच अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येणार आहे.
- मंगेश चितळे,उपायुक्त,
पनवेल शहर महानगरपालिका.