बेकायदा धार्मिक स्थळांवर लवकरच कारवाई
By Admin | Published: November 7, 2016 03:09 AM2016-11-07T03:09:56+5:302016-11-07T03:09:56+5:30
शहरात तब्बल ४६0 बेकायदा धार्मिक स्थळे आहेत. सिडकोने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत या धार्मिक स्थळांवर कारवाई करावी लागणार
नवी मुंबई : शहरात तब्बल ४६0 बेकायदा धार्मिक स्थळे आहेत. सिडकोने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत या धार्मिक स्थळांवर कारवाई करावी लागणार आहे. त्यानुसार सिडकोने प्राथमिक कार्यवाही सुरू केली आहे.
सुनियोजित नवी मुंबई शहरात बेकायदा धार्मिक स्थळांचे पेव फुटले आहेत. सामाजिक उपक्रमांसाठी आरक्षित असलेल्या मोकळ्या जागा बळकावून त्यावर सर्रास धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी पदपथ, रस्ते व चौकातही धार्मिक स्थळांची उभारणी करण्यात आली आहे. आपापल्या कार्यक्षेत्रात २00९ नंतर उभारलेल्या बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने संबंधित प्रशासनाला दिले होते. यापूर्वी कारवाईसाठी १५ आॅगस्ट २0१६ पर्यंतची अंतिम मुदत दिली होती. परंतु सिडको व महापालिकेकडून यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. दरम्यान, सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने नव्याने सर्वेक्षण करून ४६0 बेकायदा धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे.
छायाचित्रांसह बेकायदा धार्मिक स्थळांची सविस्तर माहिती अंतिम अभिप्रायासाठी नियोजन विभागाकडे पाठविली होती. नियोजन विभागाच्या अहवालाच्या आधारे लवकरच शहरातील बेकायदा धार्मिक
स्थळांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे सिडकोच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)