शासकीय कार्यालयांत बायोमेट्रिक यंत्रणा बसवा
By admin | Published: April 19, 2016 02:18 AM2016-04-19T02:18:07+5:302016-04-19T02:18:07+5:30
पोलादपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कामासाठी नागरिकांना विविध कार्यालयात जावे लागते, मात्र कर्मचारी व अधिकारी कार्यालयात वेळेत उपस्थित नसल्याने पहिल्याच वेळेत
पोलादपूर : पोलादपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कामासाठी नागरिकांना विविध कार्यालयात जावे लागते, मात्र कर्मचारी व अधिकारी कार्यालयात वेळेत उपस्थित नसल्याने पहिल्याच वेळेत काम झाले आहे असे होत नाही. यामुळे नागरिकांच्या पदरी केवळ निराशाच पडत आहे. किमान चार ते पाच वेळा फेऱ्या मारल्यावर काम होते अशी स्थिती तालुक्यातील कार्यालयांची आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कामात शिस्तबद्ध व वक्तशीरपणा यावा यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा प्रणाली अमलात आली आहे; परंतु पोलादपूर तालुक्यातील बहुतेक शासकीय कार्यालयांमध्ये अद्यापही या यंत्रणेचा अभाव दिसून येत आहे.
राज्यात ई-प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या प्रत्येक विभागात प्रशासकीय यंत्रणा हायटेक होत आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी व अधिकारी वेळेवर कामावर हजर व्हावेत, याची नोंदणी होण्यासाठी बायामेट्रिक यंत्रणा (थम्ब) कार्यान्वित करण्यात आली आहे.मात्र पोलादपूर तालुक्यातील सरकारी कार्यालयांत अशी सुविधा नसल्याने कर्मचारी मनाला वाटेल तेव्हा येतात व जातातही. अधिकारी व कर्मचारी यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणीही नसल्यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. कामे वेळेवर होत नसल्याने दूर गावांतून कामासाठी येणाऱ्या ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड व नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. किरकोळ कामासाठीही चार-पाच दिवस फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे वेळ तर वाया जात आहेच सोबत पैसेही. अधिकारी व कर्मचारी कार्यालयात येण्याआधीच ग्रामस्थ पोहोचलेले असतात मात्र कार्यालयीन वेळेचे कोणतेही भान अधिकारी व कर्मचारी यांना नसते.
तालुक्यातील सरकारी कार्यालयांना भोंगळ कारभाराचे ग्रहण लागल्याची संतप्त प्रतिक्रि या नागरिक व्यक्त करत आहेत. पोलादपूर तालुक्यात तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, पोस्ट आॅफिस,सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय, सार्वजनिक बांधकाम (जिल्हा परिषद) कार्यालय,महिला व बालकल्याण कार्यालय, ग्रामीण रु ग्णालय, तलाठी , पंचायत समिती, वन विभाग कार्यालय, महावितरण कार्यालय अशी कार्यालये आहेत. थोड्या फार फरकाने सर्व कार्यालयाची स्थिती सारखीच असल्याचे नागरिक सांगतात. (वार्ताहर)