रोहा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र पक्षप्रवेशाच्या वेळी आ. अवधूत तटकरे, आ.अनिल तटकरे, जिल्हा परिषद सदस्या शुभदा तटकरे अनुपस्थित होते. रोह्यात सोमवारी निघालेल्या शिवसेनेच्या प्रचार फेरीत मात्र राष्ट्रवादीचे आ. अवधूत तटकरे व शुभदा तटकरे, शिवसेनेचे आ. भरत गोगावले यांच्यासह दिसून आले. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न करता शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदीप तटकरे यांच्या प्रचारात उघडपणे सहभागी होणाऱ्या आ.अवधूत तटकरे आणि शुभदा तटकरे यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणावरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कारवाई करण्याचे धाडस दाखविणार का, अशी चर्चा रोह्यात रंगली आहे. शिवसेनेचे नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदीप तटकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ रोहा शहरातील राम मारूती मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. सकाळी ११ च्या सुमारास रोहा बाजारपेठेतून निघालेल्या या प्रचार रॅलीत संदीप तटकरे यांच्याबरोबर आ. अवधूत तटकरे आणि शुभदा तटकरे यांची उपस्थिती पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तटकरे घराण्यातील राजकीय सत्ता संघर्ष यामुळे टोकाला पोहचल्याचे बोलले जात आहे. आ. अवधूत तटकरे यांनी आपले बंधू संदीप तटकरे यांच्या प्रचारात स्वत: उडी घेतल्याने काका सुनील तटकरे व त्यांची मुले अनिकेत, आदिती विरूध्द अनिल तटकरे व त्यांची मुले अवधूत, संदीप असा खासा संघर्ष या निवडणुकीत रोहेकरांना पाहावयास मिळणार आहे.आ. अवधूत तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात उघडउघड बंडाचा झेंडा हाती घेतल्याचे चित्र प्रचार रॅलीत दिसून आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख रवी मुंढे, तालुकाप्रमुख संजय देशमुख, नितीन तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अवधूत तटकरे शिवसेनेच्या प्रचार फे रीत सहभागी!
By admin | Published: November 08, 2016 2:38 AM