नवी मुंबई : बडोदा बँक लुटणा-या टोळीचा पर्दाफाश करूनही अद्याप चौघे जण पोलिसांच्या हाती लागले नाहीत. चौघेही मजूर कामगार असून, त्यांनी भुयाराचे खोदकाम केले होते. या कामी त्यांनाही एक किलो सोने दिल्याची मुख्य सूत्रधाराने पोलिसांकडे कबुली दिल्याने पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत.जुईनगर येथील बडोदा बँक लुटल्याच्या घटनेला एक महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या तीनच दिवसांत ११ जणांसह टोळीच्या मुख्य सूत्रधाराला अटक करून गुन्ह्याचा उलगडा केला. बँकेखालून सुमारे ३० फूट लांब भुयार खोदून लॉकर फोडण्यात आले होते. टोळीचा मुख्य सूत्रधार हाजीद अली मिर्जा बेग याने भुयार खोदण्यासाठी दीपक मिश्रा याची मदत घेतली होती. त्यानुसार मिश्रा याने उत्तरप्रदेशमधील तिघा साथीदारांना बोलावून घेतले होते. त्यांनीच सोबत आणलेल्या उत्तरप्रदेशातील गुटखा व वृत्तपत्रामुळे हा गुन्हा उघड करण्यास पोलिसांना मदत मिळाली. मात्र, गुन्हा केल्यानंतर सूत्रधार बेग याच्यासह ११ जण पोलिसांच्या हाती लागले आहेत; परंतु भुयार खोदणाºया त्या चौघांपर्यंत मात्र पोलीस अद्याप पोहोचू शकलेले नाहीत.गुन्ह्यानंतर चोरीच्या मुद्देमालाच्या वाटणीत सदर चौघांना एक किलो सोने दिल्याची कबुली बेग याने पोलिसांना दिली आहे. मात्र, ते हाती लागले तरच जप्तीचा मुद्देमाल वाढू शकतो. यानुसार मिश्रा व त्याच्या साथीदारांच्या शोधासाठी गुन्हे शाखा व परिमंडळ पोलिसांच्या पथकाने त्यांच्या उत्तरप्रदेशातील राहत्या घरासह इतरही संशयित ठिकाणी झडाझडती घेतली. यानंतरही त्यांच्याविषयीची ठोस माहिती हाती लागलेली नाही.
बडोदा बँक लुटणारे चौघे अद्यापही फरार, खोदकाम करणारे मजूर, मुद्देमाल जप्तीचे पोलिसांपुढे प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 1:58 AM