नामदेव मोरेनवी मुंबई : एपीएमसी पोलीस स्टेशन व उपआयुक्त कार्यालयापासून अर्धा किलोमीटर अंतरावर अमली पदार्थ ओढणाऱ्यांचे अड्डे तयार झाले आहेत. भूखंडावर अतिक्रमण करून व महावितरणच्या सबस्टेशनमध्ये दिवसरात्र अमली पदार्थांचे सेवन व जुगार खेळण्यात येत असून तक्रारी करूनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नाही.
नवी मुंबईमधील गांजा विक्री व ओढणाऱ्यांचे सर्वाधिक अड्डे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आहेत. धान्य मार्केटच्या समोरील बाजूला सेक्टर १९ अ मधील भूखंड क्रमांक ४७ वर अमली पदार्थ ओढणाऱ्यांनी झोपडी तयार केली आहे. या झोपडीमध्ये दिवस - रात्र अमली पदार्थांचे सेवन करीत अनेक तरुण बसलेले असतात. येथून ये - जा करणारांना भीती वाटू लागली आहे. येथील अमली पदार्थांचे अड्डे बंद करावेत व संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी व्यावसायिकांनी लेखी स्वरूपात एपीएमसी पोलिसांकडे केली आहे. याच परिसरातील भूखंड क्रमांक ३७ जवळ अशाच प्रकारे याा लोकांचा वावर सुरू असतो. याच ठिकाणी महावितरणचे सबस्टेशन आहे. या सबस्टेशनमध्ये व बाहेरही दिवसभर जुगाराचा अड्डा सुरू असतो. बिनधास्तपणे अवैध व्यवसाय सुरू असतानाही काहीच कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
धान्य मार्केटच्या समोरील बाजूला अवैध प्रकार सुरू असून मार्केटच्या दुसऱ्या बाजूला एपीएमसी पोलीस स्टेशन, परिमंडळ १चे उपआयुक्त यांचे कार्यालय आहे. सहायक आयुक्तांचे कार्यालयही एक किलोमीटर अंतरावर आहे. पोलिसांची नियमित वर्दळ सुरू असलेल्या रोडजवळ असे अड्डे तयार झालेच कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे. याच परिसरात सहजपणे गांजा व इतर अमली पदार्थ उपलब्ध होतात. यामुळे गांजा ओढणारे तरुण येथील मोकळ्या भूखंडांचा आश्रय घेऊन नशा करीत बसलेले असतात.
कचराकुंडी हटविण्याचीही मागणीभूखंड क्रमांक ४७ च्या समोर कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. रोडवर ही कुंडी ठेवली असून रोडवरच कचरा पडलेला असताे. यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. येथील कचराकुंडी हटविण्याचीही मागणी करण्यात आली असून याविषयी महानगरपालिका प्रशासनास पत्र दिले आहे.
कायदा व सुव्यवस्था धोक्यात याआधी सानपाडामध्ये गांजा ओढून भांडण करणाऱ्यांना हटकल्याने संबंधितांनी दोघांना जखमी केले होते. तर, वाशीत एक गंभीर जखमी झाला होता. एक तरूणावर लैंगिक अत्याचार झाला होता. एपीएमसी परिसरातील अड्डे वेळेत बंद न केल्यास येथे ही दुर्घटना होण्याची भीती आहे.
अनधिकृत पार्किंगया परिसरातील भूखंड क्रमांक ४७, ३७ च्या समोरील मुख्य रोडवर अनधिकृतपणे पार्किंग सुरू आहे. या पार्किंमुळेही अमली पदार्थ ओढणारांना आश्रय घेता येत आहे. येथील पार्किंग बंद करण्यात यावी अन्यथा भविष्यात एखादा गंभीर गुन्हा या परिसरात होईल, अशी भीतीही व्यावसायिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.
पथदिवे आहेत बंद कोपरीपासून माथाडी भवनकडे येणाऱ्या रोडच्या बाजूचे पथदिवे बंद आहेत. महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही पथदिवे सुरू केले जात नाहीत. पथदिवे नसल्यामुळे अमली पदार्थ ओढणारे व विकणारे या परिसरात तळ ठोकून बसत आहेत. लवकरात लवकर पथदिवे सुरू करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे.