कोपरखैरणेतील तलावात नौकाविहार, महापौरांच्या हस्ते शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 02:55 AM2019-01-07T02:55:19+5:302019-01-07T02:55:53+5:30
महापौरांच्या हस्ते शुभारंभ : महापालिकेचा उपक्रम
नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर १९ येथील तलावात आता नौका विहाराचा आनंद लुटता येणार आहे. महपालिकेच्या माध्यमातून या तलावात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. रविवारी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
कोपरखैरणे परिसरात सेक्टर १९ मध्ये सर्वात मोठा तलाव आहे. या तलावात गणेशविसर्जन व इतर धार्मिक विधी केले जातात. शिवाय तलाव परिसरात जॉगिंगची उत्तम सोय करण्यात आली आहे. यात आता बोटिंगची भर पडली आहे. सध्या या ठिकाणी सहा बोटी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात एक मोटारबोट, दोन फॅमिली बोटी आणि चार पॅडल बोटींचा समावेश आहे. या सेवेसाठी महापालिकेने मेसर्स स्वेअर मरीन सोल्युशन प्रा.लि. या कंपनीबरोबर एका वर्षाचा करार केला आहे. कोपरखैरणे येथील स्थानिक नगरसेवक शिवराम पाटील आणि नगरसेविका अनिता शिवराम पाटील यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी ही बोटिंग सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, ‘स्वच्छ नवी मुंबई, सुंदर नवी मुंबई’ असे ब्रीदवाक्य असलेल्या या शहराचे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता ही आपली स्वत:ची जबाबदारी समजून काम केले पाहिजे, असे प्रतिपादन महापौर जयवंत सुतार यांनी बोटिंग सेवेच्या उद्घाटनप्रसंगी केले. या वेळी माजी सरपंच मोरेश्वर पाटील, प्रकल्पग्रस्त महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री पाटील, शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष महादेव पाटील, कीर्तनकार सोपान महाराज, मनोहर मुकादम, गोपीनाथ आगास्कर आदी उपस्थित होते.