मृत्युदर कमी करण्याचे आव्हान; नव्या आयुक्तांच्या कार्यप्रणालीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:15 AM2020-07-20T00:15:31+5:302020-07-20T00:15:37+5:30
आतापर्यंत ३४३ जणांचा बळी
नवी मुंबई : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. शनिवारपर्यंत ११,४२८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७,२१३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक असले, तरी मृतांचा आकडा मात्र धडकी भरविणारा आहे. कारण कोरोनामुळे मृतांचा आकडा ३५0च्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे मृत्युदर कमी करण्याचे मोठे आव्हान महापालिकेचे नवनियुक्त अभिजीत बांगर यांच्यासमोर समोर आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी बांगर काय भूमिका घेतात, याकडे सध्या शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महापालिकेला अपयश आल्याचा ठपका ठेवून आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताच दुसऱ्या दिवशी सिडको एक्झिबिशन सेंटर येथील कोविड रुग्णालयात अॅन्टीजेन चाचणी सुरू केली आहे. त्यामुळे कोरोनाची चाचणी जलद होऊन बाधित रुग्णांवर लगेच उपचार सुरू करणे शक्य होणार आहे, तसेच या कोविड रुग्णालयातील पहिल्या १००० खाटा आॅक्सिजन बेडमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे, १०० आयसीयू खाटा निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन विविध प्रवर्गातील सुमारे पाच हजार पदांची भरती करण्यात येणार असून, त्यासंबंधीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूणच पदभार स्वीकारताच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बांगर यांनी उचललेली पावले दिलासा देणारी असल्याने शहरवासीयांनी काही प्रमाणात सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. असे असले, तरी नव्या आयुक्तांसमोर सध्या मृत्युदर कमी करण्याचे मोठे आव्हान आहे. कारण शनिवारी कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. च्रविवारी तिघांचा मृत्यू झाला आहे, तर नवी मुंबईतील मृतांची एकूण संख्या ३४३ इतकी झाली आहे. त्यामुळे मृत्यूचा दर कमी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत.