नवी मुंबई : सीवूड रेल्वे स्टेशनसमोरील ३७ वृक्ष वाचविण्यासाठी नागरिकांनी ‘चिपको’ आंदोलन सुरू केले आहे. एल अॅण्ड टीला वृक्ष तोडण्यासाठी दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी व अनधिकृतपणे पदपथ उखडून पालिकेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. शिवसेना शाखाप्रमुख समीर बागवान, सीवूड रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशन, कवी कुसुमाग्रज वाचनालय, सेवाधारी ज्येष्ठ नागरिक संघटना व हरित नवी मुंबई या संघटनांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. महापालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतरही वृक्षतोड थांबविली नसल्याने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून वृक्षाभोवती कडे केले. १५ वर्षांपासून ही झाडे रहिवाशांना सावली देत आहेत. येथील प्रदूषण कमी करण्याचे काम करत आहेत. आता फक्त एल अॅण्ड टी इमारतीचा समोरील भाग रोडवरून ये-जा करण्यासाठी सहज दिसावा यासाठी पदपथावरील वृक्ष तोडण्याची परवानगी दिली आहे. पालिकेच्या या निर्णयाचा रहिवाशांनी विरोध केला आहे. पुन्हा वृक्ष तोडण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतल्याने महापालिका वृक्षतोड थांबविणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिडकोने एल अॅण्ड टीच्या माध्यमातून सीवूड रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे काम सुरू केले आहे. या कामामुळे नागरिकांना गैरसोयींना होत आहे. इमारतीत व्यावसायिक वापर सुरू करण्यासाठी पालिकेने तात्पुरते भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे. यानंतर या इमारतीचा दर्शनी भाग रोडवरून सहज दिसावा यासाठी समोरील ३७ वृक्ष तोडण्याची परवानगी दिली होती. रेल्वे स्टेशनचे काम करताना ठेकेदारांनी पर्यावरणाचे प्रचंड नुकसान केले आहे. विनापरवाना पदपथ तोडला असून या प्रकरणी संबंधितांवर मालमत्तेचे नुकसान झाल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी शिवसेना नेते विठ्ठल मोरे, विजय माने, काशिनाथ पवार, सुमित्र कडू, राजेंद्र मोकल, समीर बागवान, महेश कोठीवाले व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वृक्ष वाचवण्यासाठी सीवूडमध्ये ‘चिपको’ आंदोलन
By admin | Published: November 15, 2016 4:22 AM