- कमलाकर कांबळे ।
नवी मुंबई : मागील अनेक वर्षांपासून सिडकोच्या विविध विभागांत सुरू असलेले ‘सल्लागार’राज संपुष्टात आले आहे. सल्लागारासाठी महिन्याला लाखो रुपये खर्च करावे लागत होते. हा खर्च अनाठायी वाटल्याने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी मुदत संपलेल्या सल्लागारांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत बहुतांशी विभागातील सल्लागार कमी करण्यात आले आहेत.सिडको हे राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाते. या महामंडळाचा कारभार विविध १८ विभागांच्या माध्यमातून चालतो. यात पणन, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, मालमत्ता, व्यवस्थापन, नियोजन, भूमी व भूसंपादन, पुनर्वसन, समाजसेवा व जनसंपर्क आदी प्रमुख विभागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत सिडकोने विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, मेट्रो, नेरुळ-उरण रेल्वे हे प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहेत.या प्रमुख प्रकल्पांसह विविध विभागांच्या कामकाजावर देखरेख व नियोजन करण्यासाठी सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी नामांकित सल्लागार कंपन्यांची नियुक्ती केली होती. त्याचबरोबर सल्लागार म्हणून काही सेवानिवृत्त अधिकाºयांचेही पुनर्वसन करण्यात आले होते. त्यासाठी लाखो रुपयांचे मानधन व इतर सुविधा दिल्या जात होत्या.या सल्लागारांचा संबंधित विभागाच्या कामकाजात हस्तक्षेप वाढू लागल्याने कामगार संघटनांनी त्याला विरोध दर्शविला होता. तसेच या सल्लागार पद्धतीमुळे सिडकोतील अधिकारी व कर्मचाºयांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत असल्याचा आरोप केला जात होता. वर्षभरापूर्वी भाटीया यांची बदली होऊन त्यांच्या जागेवर भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली. गगराणी यांनी सल्लागार संस्कृतीला होत असलेला विरोध लक्षात घेऊन ही पद्धती मोडीत काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या वर्षभरात मुदत संपुष्टात आलेल्या सल्लागार कंपन्या आणि सेवानिवृत्त अधिकाºयांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यामुळे सिडकोच्या कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे.सिडकोची स्थापना झाली, तेव्हा २२०० इतका कर्मचारी वर्ग होता. गेल्या ४५ वर्षांत अनेक अधिकारी व कर्मचारी निवृत्त झाले आहेत. सध्या केवळ १३०० कर्मचारी शिल्लक आहेत. पुढील वर्षभरात यातील अनेक कर्मचारी निवृत्तीच्या वाटेवर आहेत. सिडकोच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी अनुभवी अधिकाºयांची गरज भासणार आहे. हे लक्षात घेऊन प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील कर्मचाºयांची अलीकडेच भरती करण्यात आली आहे. तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयांची भरती कार्यवाहीच्या प्रक्रियेत आहे.गेल्या वर्षभरात मुदत संपलेल्या बहुतांशी सल्लागारांना नारळ देण्यात आला आहे. मार्केटिंग विभागात तज्ज्ञ अधिकाºयांची गरज असल्याने, सेवानिवृत्त झालेले विवेक मराठे यांना सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांचीही मुदत संपुष्टात आली आहे. मराठे यांचा अपवाद सोडता बहुतांशी विभागातील ‘सल्लागार’राज संपुष्टात आले आहे.सल्लागार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण’ अशीच स्थिती सिडकोत निर्माण झाली होती. त्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम जाणवत होता. या पार्श्वभूमीवर सल्लागार पद्धती बंद होणे गरजेचे होते. व्यवस्थापनाचा हा निर्णय सिडकोच्या हिताचा आहे.- जे. टी. पाटील,जनरल सेक्रेटरी,सिडको एम्प्लॉइज युनियन