पनवेल पालिकेत हवे सिडकोचे रुग्णालय; वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 03:23 AM2020-07-19T03:23:11+5:302020-07-19T03:23:18+5:30

पालिका करतेय विशेष भरती

CIDCO Hospital in Panvel Municipality; The growing number of patients raised the concern of the administration | पनवेल पालिकेत हवे सिडकोचे रुग्णालय; वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढली

पनवेल पालिकेत हवे सिडकोचे रुग्णालय; वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढली

googlenewsNext

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविडच्या रुग्णांची संख्या ४ हजारांच्या घरात पोहोचली आहे, तर पनवेल ग्रामीण व उरण या पनवेल नजीकच्या भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना, सध्या उपलब्ध असलेले दवाखाने आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाने पुढाकार घेऊन या ठिकाणी कोविडबाबत यंत्रणा उभारणीच्या मागणीला जोर आला आहे .

तर, कोविडचा वाढता ताण लक्षात घेता, पालिकेने विशेष भरती करण्याचे ठरवले आहे. यामध्ये ५ पूर्णवेळ फिजिशियन, ३ अर्धवेळ फिजिशियन, ३ भूलतज्ज्ञ, २० वैद्यकीय अधिकारी, आयुषच्या उपचारांसाठी ५० वैद्यकीय अधिकारी, ३० परिचारिका, ५० आरोग्यसेविका आणि ५ फार्मासिस्ट यांची आवश्यकता आहे. या सर्व पदांसाठी महापालिकेने आॅनलाइन अर्ज मागविले असून, इच्छुकांना तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

यंत्रणा उभारणीसाठी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, कामगार नेते महेंद्र घरत सेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत, सत्याग्रह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.के. डोंगरगावकर, नगरसेवक हरेश केणी, नगरसवेक अरविंद म्हात्रे आदींसह अनेक सामाजिक संघटना राजकीय पदाधिकाऱ्यांनी ही मागणी सिडको प्रशासनाकडे केली आहे.

पनवेल महानगरपालिका प्रशासनानेही याबाबत सिडकोशी पत्रव्यवहार केले आहेत. अद्याप काहीच हालचाली सिडको प्रशासनामार्फत झाल्या नसल्याचे दिसून येत आहे.

राज्य शासनाची भूमिका महत्त्वाची

पालिका प्रशासन, आमदार, विविध पक्षांचे पदाधिकारी सिडकोसोबत पत्रव्यवहार करून, पनवेलमध्ये कोविड रुग्णालय उभारणीचा रेटा लावत असले, तरी याबाबत थेट निर्णय मुख्यमंत्री अथवा नगरविकास खात्याचे मंत्रीच घेऊ शकत असल्याने, राज्य शासनाने सिडको प्रशासनाला याबाबत तशा प्रकारचे आदेश देणे गरजेचे आहे. राज्य शासनाने पुढाकार घेतल्यास सिडकोला त्वरित याबाबत निर्णय घेता येणार असल्याने पनवेलमध्ये कोविड रुग्णालय उभारणीबाबत राज्य शासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: CIDCO Hospital in Panvel Municipality; The growing number of patients raised the concern of the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.