नवी मुंबई : शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. स्वच्छतेचा विषय प्रामुख्याने ऐरणीवर आला आहे. गाव-गावठाणात तर भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेवून विविध नागरी समस्यांबाबत चर्चा केली. नागरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक तेथे आमदार निधीतून खर्च करण्याची तयारी त्यांनी या बैठकीत दर्शविली.मागील दोन वर्षांत शहरातील नागरी सुविधांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे उपलब्ध सुविधा कोलमडल्या आहेत. उद्यानांची दुरवस्था झाली आहे. विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची प्रक्रिया रखडली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून अद्ययावत केलेली मलनि:सारण यंत्रणा कुचकामी ठरली आहे. दोन वर्षे गाळ उपसला न गेल्याने तलावांची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. साफसफाईअभावी नाले तुंबले आहेत. गटारांची झाकणे गायब झाली आहेत. दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा कोलमडली आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यात पहिला क्रमांक पटकाविणाºया नवी मुंबई शहरातील नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. विशेषत: ग्रामीण भागात या समस्येने अधिक विक्राळ स्वरूप धारण केले आहे. मूळ गावात दैनंदिन कचरा उचलण्याच्या कामात अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे गावाच्या नाक्यानाक्यावर कचºयाचे ढीग पाहायला मिळत आहेत. कचरा कुंड्या ओसंडून वाहत आहते. शहरी भागातील परिस्थिती सुध्दा फारशी चांगली नाही. रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची गती मंदावली आहे. दिवसाआड लहान-मोठे अपघात होत आहेत. यासंदर्भात रहिवाशांत कमालीची नाराजी आहे.विविध नागरी समस्यांबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत आमदार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेतली. यावेळी चर्चेच्या वेळी त्यांनी शहरवासीयांना भेडसावणाºया नागरी समस्यांचा पाढा वाचला. महापालिकेच्या बहुद्देशीय इमारतीत आरोग्य केंद्र सुरू करणे, समाज मंदिर, महिला बचत गटांसाठी स्वतंत्र भवनची निर्मिती, व्यायामशाळा, वाचनालय आदी सुविधा अद्ययावत करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.तसेच उद्यान विभागाकडून काढण्यात आलेल्या निविदा रद्द करून स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना त्यात प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे आणि महापालिका शाळांत सॅनेटरी नॅपकीन मशिनव डिस्पोजल मशिन बसविण्यासाठी आमदार निधीतून खर्च करण्याची तयारी त्यांनी या बैठकीत दर्शविली.दरम्यान, आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केलेल्या सर्व नागरी प्रश्नांचा आढावा घेवून त्यांची पूर्तता केली जाईल, असे आयुक्त डॉ. रामास्वामी एन.यांनी या बैठकीत सांगितले. तसेच विकासकामांसाठी आमदार निधीचा वापर करण्यासाठी महापालिका सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.गणेशोत्सवाच्या काळात गणेश दर्शनाच्या निमित्ताने शहराच्या अनेक गावांना भेटी दिल्या. या दरम्यान, गाव-गावठाणातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याची बाब निदर्शनास आली. विशेषत: ठिकठिकाणी कचºयाचे ढीग, त्यामुळे पसरलेली दुर्गंधी यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. यासंदर्भात अनेक रहिवाशांनी प्रत्यक्ष भेटून तक्रारी केल्या आहेत.- मंदा म्हात्रे,आमदार, बेलापूर
नागरी सुविधांचा बोजवारा, रहिवासी त्रस्त, मंदा म्हात्रे यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 6:32 AM